जिल्हा परिषद शाळांना पुरवण्यात येत असलेल्या फायबर किचनशेडचा दर्जा निकृष्ट असून याबाबत शासनाकडे तक्रार करण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धाचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे, तसेच या स्पर्धेसाठी प्रत्येक तालुक्याला ७५ हजार असे ९ लाख ७५ हजार व प्रत्येक विभागाला १ लाखाप्रमाणे १५ लाखांचा निधी वाटप करण्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील तरतुदीप्रमाणे शिक्षकांचे समायोजन होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी होणार असल्याची माहिती शिक्षण सभापती वंदना पाल यांनी दिली. खेळणी साहित्यासाठी मंजूर झालेला निधी इतर कामावर खर्च केल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. याची दखल घेऊन वंदना पाल यांनी हा निधी खेळणी साहित्यासाठीच वापरण्याची सूचना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिली. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ातील शाळा इमारतींचे नुकसान झाले आहे. अशा शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक असून तसे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
सायकल खरेदीसाठी करण्यात आलेल्या तरतुदीच्या ३ टक्के निधी अपंगांसाठी सायकलींवर खर्च करायचा असल्याने यावर ३ लाखांचा खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली असल्याचे वंदना पाल यांनी सांगितले.