जिल्ह्य़ातील गडकोट संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या येथील दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे चांदवड तालुक्यातील धोडप किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या संवर्धन मोहिमेंतर्गत विहिरी, टाक्या, बारव यांची स्वच्छता करण्यासह शेकडो बियांचे रोपण करण्यात आले.
राज्यातील १६ किल्ल्यांची संवर्धन मोहीम वन विभागाने हाती घेतली असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील धोडप, साल्हेर, रामशेज आणि हातगड यांचा समावेश आहे. वन क्षेत्रालगतच्या किल्ल्यांचा विकास करण्यासाठी वन विभाग, स्थानिक रहिवासी आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळ यांच्या वतीने ही मोहीम आखण्यात आली आहे. सह्य़ाद्रीच्या पूर्वेकडील अजिंठा सातमाळा डोंगररांगेत धोडप किल्ला आहे. नाशिककडून आग्रा महामार्गाने ५५ किलोमीटर गेल्यावर वडाळीभोई गावापर्यंत पोहोचल्यावर तेथून धोंडाबे-कुंडाणेमार्गे सालईबन या गावी जावे. वाहन गावात उभे करून वाटाडय़ा सोबत घेऊन किल्ल्यावर स्वारी करायची. धोंडाबे-हट्टी या दुसऱ्या मार्गानेही किल्ल्यावर जाता येते. कळवण तालुक्यातील ओतूरमार्गेही किल्ल्यावर जाता येते. हट्टीपासून पंधरा मिनिटांत आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. भुयारी मार्गाने किल्ल्यात प्रवेश करता येतो. या ठिकाणी पारशी लिपीत दोन शिलालेख आहेत. गडावर दोन विहिरी आहेत.
शिवाजी महाराजांनी सुरतहून परतत असताना १७ ऑगस्ट १६७० रोजी कांचनबारीत मोगलांशी लढा देऊन यश मिळविले. या लढाईचा ‘कांचन-मांचनची लढाई’ आणि ‘वणी-दिंडोरीची लढाई’ म्हणूनही उल्लेख आढळतो. धोडप किल्ला कोणी जिंकला याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. मराठी रियासतमध्ये किल्ला परिसरात राघो भरारी आणि माधवराव पेशवे या चुलत्या-पुतण्याचे युद्ध झाल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत किल्ल्यावरील वाडे, बुरूज ढासळले आहेत. गुहेमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. प्रतिष्ठानतर्फे किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तळी स्वच्छ करण्यात आली. बारवमधील कचरा काढण्यात आला. आंब्याच्या कोयी, फणस, आवळा, चिंच, सोनचाफा, बकुळ, जांभूळ आदींसह विविध वृक्षांच्या बियांचे रोपण करण्यात आले. या मोहिमेत प्रा. आनंद बोरा, पप्पू जगताप, सागर बनकर आदींनी सहभाग घेतला.