* काँग्रेसचा आरोप  * संभ्रम दूर करण्यासाठी घेणार जाहीर सभा
स्थानिक संस्था कर अर्थात एल.बी.टी.विषयी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर या कराविषयी जनता तसेच छोटय़ा व्यापाऱ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी आता उशिरा का होईना ठाण्यातील काँग्रेसने पुढाकार घेतला असून या कराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले आहे. स्थानिक संस्था कर नेमका कुणासाठी आणि कशा प्रकारे लागू होतो, याची सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रके तसेच जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. या करपद्धतीमुळे जकात चोर तसेच काही राजकीय नेत्यांचे हफ्ते बंद होणार असल्यानेच व्यापाऱ्यांना फूस लावून नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अशा बंदमध्ये सहभागी होऊन ठाणेकरांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात  कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करणार असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेमध्ये स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला असून त्यास व्यापाऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. तसेच हा कर लागू झालेल्या अन्य महापालिकांमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून या कराविरोधात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केला आहे. तसेच या करासंबंधी व्यापाऱ्यांकडून उलटसुलट प्रचार सुरू असल्याने छोटे व्यापारी आणि जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिका क्षेत्रातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना स्थानिक संस्था कर म्हणजे काय, या विषयीची माहिती दिली. दरम्यान, ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर आणि महापालिकेचे स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीविषयी माहिती दिली.
२००९ पासून राज्यातील वेगवेगळ्या महापालिकांमध्ये स्थानिक संस्था कर टप्प्याटप्प्याने लागू झाला असून त्या महापालिकांच्या महसुली उत्पन्नामध्ये १० ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. असे असतानाही स्थानिक संस्था कराच्या नावाखाली व्यापाऱ्यांना फूस देऊन काही राजकीय नेत्यांनी काँग्रेसला बदनाम करण्याचा कट रचला आहे. या करामुळे जकात चोरांना तसेच ज्यांच्या घरी हफ्ते जायचे, अशा गडगंज नेत्यांना पायबंद बसणार आहे. तसेच त्यांना स्थानिक संस्था करामध्ये वाव नाही, त्यामुळेच त्यांनी व्यापाऱ्यांना फूस देऊन ठाणेकर जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केला आहे, असा आरोप पूर्णेकर यांनी या वेळी केला. स्थानिक संस्था कराविषयी फारशी माहिती नसल्याने छोटे व्यापारी तसेच जनतेमध्ये उलटसुलट प्रचार केला जात आहे. त्यामुळे पत्रके तसेच जाहीर सभांच्या माध्यमातून या कराविषयी जनजागृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.