समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा, या भावनेतून स्थापन झालेल्या जटपुरा युवक गणेश मंडळाच्या चंद्रपूरचा राजाची गणेशाची मूर्ती दरवर्षी चंद्रपूरकरांसाठी गणेशोत्सवात आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू असतो. यावर्षी ७० फुटाच्या द्वारकाधीश मंदिरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. अगदी पहिल्या दिवसापासून गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे.
जटपुरा युवक गणेश मंडळाचा नवसाला पावणारा चंद्रपूरचा राजा प्रसिद्ध आहे. जटपुरा गेट येथे १९७४ला सव्वा रुपयाच्या गणेश मूर्तीची स्थापना करणारा गणेश मंडळ पाहता पाहता नवसाला पावणारा चंद्रपूरचा राजा म्हणून प्रसिद्ध झाला. चंद्रपूरचा राजा यावर्षी ३९व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. हे मंडळ नोंदणीकृत सार्वजनिक पब्लिक ट्रस्ट असून भक्तांकडून दान रूपात मिळालेली देणगी सामाजिक कार्यात खर्च केली जाते. दरवर्षी रक्तदान शिबीर घेऊन गरजूंना मदत करणे, गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, मोफत शिलाई मशीन वाटप, अन्नदान, अल्प दरात रुग्णवाहिका सेवा देणे आदी कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर सुरू असते, तसेच चंद्रपूरचा राजा नवसाला पावतो, ही ऑडियो व व्हिडीओ स्वत:ची अल्बम सिटी तयार करणारे विदर्भातील पहिलेच गणेश मंडळ असून स्वत:ची वेबसाइट असलेले हे हायटेक गणेश मंडळ आहे. या कार्यामुळेच जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
‘चंद्रपूरचा राजा नवसाला पावला गणपती’ या शब्दांचा प्रयोग गणेश भक्तांनी या मूर्तीकरिता खरा केला असून कित्येक भक्तांनी लेखी स्वरूपात नोंद केली आहे की, आमची मनोकामना पूर्ण झाली आहे.
 गेल्या तीन महिन्यांपासून मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारीला लागले होते. पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर व भव्य दर्शन घडविण्याकरिता मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत होते. २०१३च्या श्री दर्शनामध्ये मुंबई, पुण्याच्या धर्तीवर शहरामध्ये सुमारे १३ लाख रुपयांच्या खर्चाने हे भव्य श्री दर्शन घडत आहे.
यावर्षी कोलकाता येथील कारागिरांद्वारा निर्मित ७० फुटाची भव्य सुंदर द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. आतील गाभाऱ्यात राजवाडय़ाची सुंदर कलाकृतीची सजावट करण्यात आली आहे व त्यात विराजमान सिंहासनाधीश्वर मनाला मोहीत करणारी रत्नहिरेजडीत साक्षात १८ फूट उंच चंद्रपूरचा राजा गणपतीच्या मूर्तीचे भव्य दर्शन होत आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे, संपूर्ण विदर्भात तरी ही एकमेव मूर्ती असून तिला लागणारे ३५ मीटरचे वस्त्र रोज बदलण्यात येते. दहा दिवसांत दहा नवनवीन रंगांच्या वस्त्रात दहा नवीन रूपात या चंद्रपूरचा राजाचे अनोखे दर्शन घडणार आहेत.
ही मूर्ती घडविण्यात मूर्तिकार म्हणून विजय कोहळे, गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली आहे. तसेच मूर्तीची वेशभूषा, कलाकृतीही दीपक बेले व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारली आहे. चंद्रपुरात पहिल्यांदाच कोलकाता पॅटर्नची रोषणाई जटपुरा गेट व परिसरात लावण्यात आली आहे. गणेशोत्सवाकरिता जटपुरा गेट परिसर नव्या नवतीसारखा सजविण्यात आला आहे.
मुंबई-पुण्याच्या पॅटर्नवर साजरा करण्यात येणाऱ्या या भव्य गणेशाचे दर्शन प्रत्येकाने घ्यावे, असे आवाहन गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले, दिलीप कपूर, महेश बेले, देवेंद्र बेले, विक्रांत पाटील, कमलेश वैरागडे, बाळकृष्ण वैरागडे, कार्तिक आगडे, जगदीश आगडे, भुवन बेले, राहुल बेले, सोनू आगडे, संजय बेले, प्रवेश बुटले, अमित बानकर, पंकज वैरागडे यांनी केले आहे.