सोशल मीडियाने सर्वच क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर वन्यजीवांचे क्षेत्रही त्यात मागे नाही. पर्यावरण संतुलनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या वन्यप्राणी, पक्ष्यांची नोंदणी पक्षी अभ्यासक करतच असतात. सध्याचे युग हे इंटरनेटचे युग असल्याने त्यावर पक्षी नोंद करण्याच्या दृष्टीने नवीन माध्यमे उपलब्ध होत आहेत. इ-बर्ड हे संकेतस्थळ असेच उपयुक्त माध्यम असून यावर पक्षीनिरीक्षक त्यांच्या नोंदी करू शकतात. या पक्षी नोंदणीसाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पक्षी अभ्यासकांना करून देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वडाळी निसर्ग संकुलात वाईल्डलाईफ अँड एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन सोसायटी (वेक्स)च्यावतीने कार्यशाळा घेण्यात आली.
विदर्भ तसेच सातपुडय़ातील पक्षी अभ्यास व त्यांच्या नोंदणीसाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्त्याने अमरावती येथील ‘वेक्स’ कार्यरत आहे. गेल्या १५ वर्षांत या संस्थेच्या पक्षी अभ्यासकांनी विदर्भ तसेच महाराष्ट्रासाठी नवीन पक्ष्यांच्या नोंदी, पक्ष्यांचा क्षेत्रविस्तार, पक्षी सुची शास्त्रीय पद्धतीने तयार केली आहे. या संस्थेच्यावतीने आयोजित या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बेंगळुरू येथील इ-बर्डचे महाराष्ट्र समन्वयक रोहीत चक्रवर्ती उपस्थित होते.
तसेच इंडियन बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क, बीएनएचएस मुंबईचे नंदकिशोर दुधे यांचीही उपस्थिती होती. कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे सचिव श्याम देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक  डॉ. जयंत वडतकर, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. डॉ. गजानन वाघ, विभागीय वनाधिकारी शिवाजी भगत उपस्थित होते.
इ-बर्डची उपयुक्तता व त्याचा वापर, त्यावरील माहितीचा संशोधकांना होणारा उपयोग यावर प्रथम सत्रात रोहीत चक्रवर्ती यांनी माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात बर्ड अ‍ॅटलॉसबद्दलची माहितीचे सादरीकरण करण्यात आले. नंदकिशोर दुधे यांनी ‘कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम’चे सादरीकरण केले. पक्षी अभ्यास, निरीक्षण व त्यांच्या नोंदीचे महत्त्व यासंदर्भात
डॉ. जयंत वडतकर यांनी माहिती दिली. कार्यशाळेत नागपूर, अकोला, यवतमाळ, पुसद, वाशीम येथून पक्षी अभ्यासक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण मोरे व सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीकांत वऱ्हेकर यांनी केले.