सध्याचे युग माहिती-तंत्रज्ञानाचे असूनही काही अपवाद वगळता मराठी साहित्य आणि साहित्यिक यांच्या कामाची नोंद माहितीच्या महाजालात मोठय़ा प्रमाणात झालेली नाही. ही उणीव दूर करण्यासाठी ‘युनिक फीचर्स’ने मराठी साहित्यिकांच्या ई-दस्तावेजीकरणाचे (वेब डॉक्युमेंटेंशन)चे काम हाती घेतले असून या उपक्रमात सध्या २० साहित्यिकांचे ई-दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.
जगातील पहिल्या १० भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो. मात्र माहितीच्या महाजालात इंग्रजीच्या तुलनेत मराठीच्या नोंदी खूपच कमी प्रमाणात होतात. युनिक फीचर्स आयोजित ई-मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा उपक्रम हाती घेण्यात आला. तिसऱ्या ई-मराठी साहित्य संमेलनापासून त्याची सुरुवात करण्यात आली आली. गेल्या वर्षी ताराबाई शिंदे, ह. ना. आपटे, बहिणाबाई चौधरी, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, श्री. म. माटे, दत्तो वामन पोतदार, बालकवी, चिं.वि. जोशी, बा. सि. मर्ढेकर आणि अण्णाभाऊ साठे यांची नोंद करण्यात आली. यंदा चौथ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने न. र. फाटक, मालतीबाई बेडेकर, आचार्य अत्रे, केशवसुत, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पं. महादेवशास्त्री जोशी, हमीद दलवाई, बाबुराव बागुल, शंकरराव खरात, इरावती कर्वे, चांगदेव खैरमोडे, चारुता सागर यांची नोंद घेण्यात येणार आहे. या साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान, त्या साहित्यिकाचे छायाचित्र तसेच त्या अन्य लेखकांनी त्या साहित्यिकावर लिहिलेली पुस्तके या विषयीचे टिपण, नोंदी ई-दस्तावेजीकरणात देण्यात आल्या आहेत.
या लेखकांबरोबरच ई-मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या अध्यक्षांची, रत्नाकर मतकरी, ग्रेस, भालचंद्र नेमाडे यांची माहितीही यात देण्यात आली आहे. साहित्यिकांच्या ई-दस्तावेजीकरणाची टिपणे, नोंदी http://www.uniquefeatures.in/ या संकेतस्थळावर पाहता येऊ शकतील. ई-दस्तावेजीकरण प्रकल्प सतत सुरू राहणारा असून त्यात वाचकांचाही सहभाग अपेक्षित आहे. एखाद्या साहित्यिकाची माहिती, त्याच्या साहित्याविषयाची समिक्षणात्मक नोंद, दुर्मिळ छायाचित्र uniquefeatures1@gmail.com या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन युनिक फीचर्सने केले आहे.