महानगरांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळाव्यात या शिक्षकांच्या तळमळीतून शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट झाला आहे. एके काळी प्राथमिक सुविधांचीही वानवा असणाऱ्या या शाळांमध्ये ‘ई-लर्निग’ सुविधा प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा निधी नसताना लोकसहभागातून हा प्रकल्प साकारला आहे. या डिजिटल क्रांतीमुळे तालुक्यातील पष्टेपाडा शाळेतील विद्यार्थ्यांकडे दप्तराऐवजी टॅब आले आहेत.  
शहापूर तालुक्यातील २५ शाळा डिजिटल झाल्या असून तब्बल एक हजार विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. त्यात तालुक्यातील दुर्गम मानल्या जाणाऱ्या पष्टेपाडा येथील शाळेचाही समावेश आहे. लोकसहभागातून शाळांचा दर्जा सुधारण्याची ही मोहीम आता अन्यत्रही राबविण्यात येणार आहे. पष्टेपाडा शाळेतील शिक्षक संदीप गुंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘डिजिटल स्कूल अभियान’ हा माहितीपट तयार केला आहे. अलीकडेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यातील दहा शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
शहापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४६८ शाळा असून २५ हजार विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. तालुक्यातील पष्टेपाडा येथील शाळा डिजिटल झाल्यानंतर राज्यभरातील ४५ शाळांच्या व्यवस्थापन समितीने शाळेस भेट दिली आणि आपापल्या शाळांमध्ये ही योजना राबवली. लोकसहभागातून शैक्षणिक उन्नती हे या योजनेचे वैशिष्टय़ आहे. शहापूरच्या ग्रामीण भागात भारनियमनाची समस्या आहे. शाळेतील शिक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून पुण्यातील ‘आपुलकी’ या संस्थेने संजय पाचपोर यांच्याद्वारे शाळेत सौर प्रकल्प बसविण्यात भरीव मदत केली. पुण्यातीलच श्रद्धा मेहता या युवतीने आपले लग्न साधेपणाने करून वाचविलेले पैसे पष्टेपाडा शाळेस मदत म्हणून दिले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी पष्टेपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. जायंटस् ग्रुप तसेच काही खासगी कंपन्यांच्या सहकार्याने शाळांना स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, संगणक आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. नेवरे, आटगांव, आदिवली, आसनगांव, दहिगांव आदी २५ शाळा अशा प्रकारे डिजिटल झाल्या आहेत.
गुणवत्ता विकासात पष्टेपाडा प्रथम
ठाणे जिल्हा परिषदेच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत यंदा शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. डिजिटल प्रणालीचा अवलंब करून शैक्षणिक उन्नती साधल्याने त्यांना एकूण १८८ गुण मिळाले.