महाऑनलाइन प्रक्रियेला ब्रेक
प्रशासनातील छोटी-मोठी कागदपत्रे गावपातळीवर मिळावीत, यासाठी सुरू करण्यात आलेली महा-ई-सेवा केंद्रे आठ दिवसांपासून बंद पडली आहेत. या केंद्रांमध्ये महा ऑनलाईन हे नवे सॉफ्टवेअर सरकारने लागू केले. मात्र, त्याचे प्रशिक्षण गावपातळीवर सोडा, जिल्हा व्यवस्थापकालाही देण्यात आले नाही. परिणामी, आठ दिवसांपासून या केंद्राचे कामकाज थंडावले आहे.
जिल्हय़ात दोनशेहून अधिक ठिकाणी महा-ई-सेवा केंद्रे उघडली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून सात-बारापासून ते वेगवेगळय़ा प्रमाणपत्रांपर्यंत सारीच कामे केली जातात. मात्र, अगदी सुरुवातीपासून महा-ई-सेवा केंद्रांच्या मागे असलेला अडचणींचा ससेमिरा अजूनही संपायला तयार नाही. तालुका व जिल्हास्तरावरील सेतू सेवा केंद्रांचे काम अजून ऑनलाईन झाले नाही. मात्र, राज्य सरकारने महा-ई-सेवा केंद्रांमध्ये महाऑनलाईन ही नवी प्रणाली सक्तीची केली आहे. कुठलीही नवी प्रणाली राबवताना ती लागू करण्यापूर्वी तिचे प्रशिक्षण संबंधितांना दिले जाते. त्यामुळे या प्रणालीत काम करणे सोपे होते.
महाऑनलाईनबाबत मात्र अगोदर ही प्रणाली सुरू करण्याची वरात काढण्यात आली. प्रशिक्षणाचे घोडे मात्र कोणालाच दिसले नाही. अगदी जिल्हा व्यवस्थापक व तालुका समन्वयकालाही नवीन प्रणालीचे प्रशिक्षण दिले नाही. त्यामुळे गावपातळीवर सुरू केलेल्या केंद्रांतील केंद्रचालकाला नवीन प्रणाली कळणे अवघड झाले आहे. मागच्या आठ दिवसांपासून जिल्हय़ातील महा-ई-सेवा केंद्रांचे कामकाज ठप्प पडले असून, राज्याचा दहा लाखांहून अधिकचा महसूल बुडाला आहे. सर्वसामान्यांना छोटय़ामोठय़ा कागदपत्रांसाठी पुन्हा एकदा तालुका अथवा जिल्हय़ाला खेटे घालावे लागत आहेत.