*‘टीएमटी’ प्रशासनाचा निर्णय
* दोन महिन्यांत योजना लागू होणार
*  तिकीट व्यवहारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न
* तिकीट विक्री होणार वेगवान  
ठाणे परिवहन सेवेच्या बसगाडय़ांमधील तिकीट ठाणेकरांना जलदगतीने मिळावे तसेच तिकीट विक्रीत गैरव्यवहार होऊ नये यासाठी ‘टीएमटी’ प्रशासनाने मुंबईच्या धर्तीवर उशिरा का होईना ‘ई-तिकीट’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तिकिटांचा अपहार तसेच हिशोबात होणारी गडबड अशा गैरप्रकारांना लगाम बसणार असून तिकीट व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. ही योजना येत्या दीड ते दोन महिन्यांत शहरात कार्यान्वित करण्याचा महापालिकेचा विचार आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे तीनशेहून अधिक बसगाडय़ा असून त्यापैकी शंभरहून अधिक बसगाडय़ा नादुरुस्त आहेत. सुमारे दोनशे बसगाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. असे असले तरी बसेस बंद पडण्याचे प्रमाण अजूनही मोठे आहे. त्यामुळे ठाणे परिवहन सेवेच्या सुविधांविषयी ठाणेकर फारसे समाधानी नसल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणेकरांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी ठाणे परिवहन सेवा सुधारणेवर भर देण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या धर्तीवर ‘ई-तिकीट’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून ही योजना येत्या दीड ते दोन महिन्यांत अमलात आणण्याचा त्यांचा विचार आहे. या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त तसेच माहिती व जनसंपर्क अधिकारीसंदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. तसेच ठाणे परिवहन सेवेमध्ये ई-तिकीट योजना लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश आयुक्त असीम गुप्ता यांनी परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तिकीट व्यवहारात पारदर्शकता
ठाणे परिवहन सेवेच्या बसगाडय़ांमधील तिकीट ठाणेकरांना जलद मिळावे. तिकिटात गैरव्यवहार होऊ नये. व्यवहारात पादर्शकता यावी. तसेच बसगाडय़ांमधील तिकीट आणि पैशांच्या हिशोबाची माहिती तिकीट तपासणीसांना तात्काळ मिळावी, यासाठी ही योजना परिवहनमध्ये राबविण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. मध्यंतरी परिवहनच्या एका कर्मचाऱ्याने तिकिटांची कलर झेरॉक्स काढून अपहार केल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच बसमधील गर्दीत आणि गडबडीत कर्मचाऱ्यांकडून तिकिटांचे वाटप करून पैसे घेण्यात येतात. पण त्या गडबडीत कर्मचाऱ्यांकडून हिशोबात तफावत येण्याचे प्रकार काही वेळेस घडतात. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी ही योजना शहरात लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. मुंबई, नवी मुंबई आणि अगदी कल्याण-डोंबिवली परिवहन ऊपक्रमांमध्येही ही योजना कार्यान्वित झाली आहे. असे असताना ‘टीएमटी’ ऊपक्रमात ही योजना कार्यान्वित होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता. मध्यंतरी ही योजना राबविण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला होता. मात्र ही योजना ढेपाळली. अखेर आयुक्त गुप्ता यांच्या आग्रहामुळे ‘ई’ तिकीट योजनेला वेग मिळाला असून लवकरच ती प्रत्यक्षात येणार आहे.