रंगभवनच्या वैभवशाली परंपरेला पुन्हा उजाळा मिळालेला पहायचा आहे, अशा शब्दात ज्येष्ठ संगीततज्ञ पंडित रघुनाथ केसकर यांनी या वास्तूशी असलेले भावनिक नाते अधिक गहिरे केले.
सांस्कृतिकदृष्टय़ा नगरकरांशी जिव्हाळ्याचे नाते असलेल्या रंगभवन या खुल्या नाटय़गृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन महापौर शीला शिंदे व त्यांचे पती अनिल शिंदे यांच्या हस्ते आज झाले. या कार्यक्रमात पंडित केसकर बोलत होते. आमदार अनिल राठोड, मनपातील सभागृह नेते अशोक बडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती उनवणे, उपसभापती मालनताई ढोणे, नगरसेवक संभाजी कदम, उपायुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष अनंत जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
पंडित केसकर यांनी यावेळी बोलताना शहराच्या विशेषत: रंगभवनच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला. रंगभवन बंद पडल्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी येते पाऊल ठेवल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, अनेक गाजलेली नाटके, दिग्गजांच्या सांगितिक मैफली येथे पाहिल्या. मी स्वत: येथे अनेक कार्यक्रम केले, अनेक नाटकांची रंगभूषा केली. केवळ नगर शहरच नव्हे तर, राज्याच्या सांस्कृतिक चळवळीत नगरच्या रंगभवनचे स्थान उच्च होते. मात्र मागच्या २५, ३० वर्षांत ही परंपरा खंडीत झाली, त्याबरोबरच सांस्कृतिक चळवळीला एक प्रकारचे ग्रहण लागले. नूतनीकरणाच्या निमित्ताने मनपाने या परंपरेलाच पुन्हा साद घातली आहे. आपले वय आता ८३ आहे, मात्र रंगभवनचे गतवैभव पुन्हा पाहण्याची आपली मनापासून इच्छा आहे, अशी भावना पंडित केसकर यांनी यावेळी व्यक्त केली.
महापौरांच्याच उपस्थितीत तीन महिन्यापूर्वी येथे शहरातील रंगकर्मीची बैठक झाली होती, त्यावेळी श्रीमती शिंदे यांनी रंगभवनच्या नूतनीकरणाचे आश्वासन दिले होते. त्याचा आवर्जन उल्लेख करीत त्या म्हणाल्या, विविध कारणांनी रंगभवनाकडे सर्वाचेच दुर्लक्ष झाले होते. मात्र त्याचे महत्व आणि नगरकरांशी असलेले बावनिक नाते लक्षात घेऊन ते जपण्यासाठीच प्राधान्याने हे काम हाती घेतले आहे, शहरातील सांस्कृतिक विशेषत: नाटय़ चळवळीला त्यामुळे निश्चितच हक्काचा रंगमंच आणि चालनाही मिळेल असा विश्वास श्रीमती शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना रंगभवनाच्या नव्या रचनेविषयी माहिती दिली. अॅम्पी थिएटरच्या धर्तीवर हे नूतनीकरण करण्यात येणार असून बंदिस्त छत वगळता नाटक किंवा सांगितीक मैफलीसाठी अवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राठोड, डोईफोडे, जोशी, सतीश लोटके यांची यावेळी भाषणे झाली. उपस्थित पाहुण्यांचा नाटय़ परिषदेच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला. रंगकर्मी प्रसाद बेडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. शहरातील रंगकर्मी व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.