डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दक्ष नागरिक संघ आणि विष्णुनगर पोलिसांच्या सहकार्याने रात्रीची गस्त घालण्यासाठी ५० ते ६० तरुणांची ईगल ब्रिगेड स्थापन करण्यात आली आहे. या तरुणांनी दोन दिवसांपूर्वी कोपर रेल्वे स्थानकावर रात्री दीड वाजता दोन गांज्या विक्रेत्यांना मोठय़ा शिताफीने पकडले.
ब्रिगेडचे कार्यकर्ते पांढऱ्या गणवेषात कोपर रेल्वे स्थानक भागात रात्री दीड वाजता गस्त घालत होते. मुंबईकडून येणाऱ्या रात्रीच्या शेवटच्या कर्जत लोकलने दोन तरुण कोपर रेल्वे स्थानकात उतरले. फलाटावरून चालण्याऐवजी ते रेल्वे मार्गातून चालू लागले. एका तरुणाने दुसऱ्याच्या हातात पुडी दिली. पथकातील तरुणांनी त्यांना थांबवले. चौकशी केली असता पथकाला ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांच्याजवळ संशयास्पद पावडर असल्याचे आढळले. तातडीने विष्णुनगर पोलिसांना ईगल ब्रिगेडने बोलवले. बिट मार्शलने या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत शाहरूख अन्सारी व रशीद अन्सारी हे दोन्ही तरुण वाराणसी येथील असल्याचे उघड झाले. त्यांच्याजवळ गांजाची पुडी आढळली. केवळ मजा करण्यासाठी या गांजाचा वापर करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्यावर  गुन्हा दाखल केला आहे.
ब्रिगेडचे कौतुक
ईगल ब्रिगेडने कौतुकास्पद कामगिरी केल्याने सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात येऊन दक्ष नागरिक संघाचे विश्वनाथ बिवलकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. अशा ब्रिगेड केवळ एका पोलीस ठाण्यापुरत्या मर्यादित ठेवण्याऐवजी त्या कल्याण परिमंडळ, ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सुरू करण्याचा विचार असल्याचे लक्ष्मीनारायण यांनी यावेळी बोलताना सांगितले.