उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात मोठीजुई येथे सर्प व निसर्ग मित्रांना एक जखमी गरुड आढळून आले. हा गरुड तुरेवाला सर्प या जातीचा असून या जखमी गरुडावर फ्रेन्ड्स ऑफ नेचर या संस्थेच्या जयवंत ठाकूर यांनी उपचार करून त्याला जीवदान दिले आहे.
निसर्गाचा ऱ्हास सुरू असून माणसाने स्वार्थासाठी निसर्गावर अतिक्रमण सुरू केले आहे. यामधून आता प्राणी-पक्षीही सुटत नाहीत. अनेक ठिकाणी प्राण्यांची शिकार केली जात आहे. हा निसर्गाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उरण तालुक्यातील काही निसर्गप्रेमी संस्था काम करीत आहेत. त्यांपैकीच जयवंत पाटील यांचीही संस्था आहे. त्यांनी यापूर्वी अनेक सापांना तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांना जीवनदान दिलेले आहे. मोठीजुई येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या गरुडाचे कोणी तरी पंख कापून त्याला जखमी केलेले होते. त्याच्यावर त्यांनी औषोधोपचार केले आहेत. अंधश्रद्धेतून या गरुडांचा मोठय़ा प्रमाणात बळी घेण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी या प्राण्यांचा बळी घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.