विधिमंडळातील अराजपत्रित अधिकारीपदासाठी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी आलेल्या शेकडो विद्यार्थी व त्यांच्या पालकांना खासगी तळावर वाहने उभी करण्यास भाग पाडून संदीप फाऊंडेशनने कमाईचा वेगळाच मार्ग धुंडाळल्याची तक्रार पालकांनी केली आहे. या संदर्भात दाद मागण्यास गेलेल्यांशी सुरक्षारक्षकांनी अरेरावीची भाषा केली. तसेच परीक्षास्थळी कोणत्याही सुविधा उपलब्ध न करता व्यवस्थापनाने पालकांना उन्हा-तान्हात बाहेर थांबविण्यात आल्याची तक्रार संबंधितांनी केली आहे.
विधिमंडळातील अराजपत्रित अधिकारीपदाच्या परीक्षेसाठी नाशिक विभागाचे महिरावणी येथील संदीप फाऊंडेशन महाविद्यालय केंद्र होते. ‘एमकेसीएल’मार्फत घेण्यात आलेली ही ऑनलाइन परीक्षा रविवारी तीन सत्रांत पार पडली. प्रत्येक सत्रात जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. नाशिकसह मालेगाव, धुळे व जळगाव जिल्ह्यांतून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी संदीप फाऊंडेशनच्या परीक्षा केंद्रावर आले होते. स्थानिक पातळीवरील शेकडो विद्यार्थ्यांनी पालक वा नातेवाईकांसमवेत दुचाकीने परीक्षा केंद्र गाठले. परंतु वाहने घेऊन आलेल्या परीक्षार्थीच्या पालकांना या ठिकाणी भरुदड सोसावा लागला. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या गेल्या नाहीत. महाविद्यालयातील वाहनतळ पूर्णपणे मोकळा असताना पालक व विद्यार्थ्यांना आपली वाहने खासगी वाहन तळावर उभी करण्याची सूचना दिली गेली. प्रत्येक वाहनासाठी दहा रुपये आकारून आर्थिक पिळवणूक करण्यात आली. याबद्दल विचारणा करणाऱ्या पालकांशी सुरक्षारक्षकांनी अरेरावीची भाषा केली. खासगी वाहनतळाद्वारे शुल्क आकारणीचा हा प्रकार सर्वसामान्यांची पिळवणूक नव्हे काय, असा प्रश्न सचिन चांगटे, अर्जुन क्षीरसागर, संजय जगताप आदींनी महाविद्यालयांच्या प्राचार्याना दिलेल्या निवेदनातही उपस्थित करण्यात आला. महाविद्यालयात पालकांना कुठे थांबण्याची व्यवस्था नव्हती. परिणामी, शेकडो पालकांना नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर उन्हात बसावे लागले. प्राथमिक सुविधाही न दिल्या गेल्यामुळे पालकांचे हाल झाले. परीक्षार्थीनाही नाहक मनस्ताप सोसावा लागला.