News Flash

ओल्या कचऱ्यापासून गांडुळखत निर्मिती

उपलब्ध क्षेपणभूमींची क्षमता संपलेली आणि नव्या जागांचा अभाव अशा अवस्थेत शहरांमध्ये निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्याचा पर्यावरणस्नेही

| January 6, 2015 06:51 am

उपलब्ध क्षेपणभूमींची क्षमता संपलेली आणि नव्या जागांचा अभाव अशा अवस्थेत शहरांमध्ये निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्याचा पर्यावरणस्नेही संकल्प नव्या वर्षांच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच ठाण्यातील पूर्व द्रूतगती  मार्गालगत कोरम मॉलच्या पाठी असणाऱ्या तारांगण संकुलाने अंमलात आणला आहे. तारांगण वसाहतीत दोन टॉवरमध्ये १४५ सदनिका आहेत. गेली काही वर्षे येथील रहिवासी कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करून मगच डम्पिग ग्राऊंडला पाठवीत होते. गुरूवारपासून त्यांनी या पर्यावरणस्नेही वाटेवरील पुढचे पाऊल टाकत आता ओल्या कचऱ्यापासून वसाहतीच्या आवारातच गांडुळ खत निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. तसेच सुका कचराही वेगळा करून तो स्वतंत्रपणे भंगारमघ्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. वसाहतीतील कचरा वेचकच या खत निर्मिती प्रकल्पाचे व्यवस्थापन करीत असून त्यासाठी त्यांना रितसर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
‘कोरस’पासून प्रेरणा
कोरस वसाहतीत दोन वर्षांपूर्वी डॉ. लता घनश्यामनानी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचा गांडूळ खत प्रकल्प राबविण्यात आला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कोरस संकुलात दोन टॉवर असून त्यात प्रत्येकी ५८ सदनिका आहेत. ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे खत कोरसवासीय त्यांच्या उद्यानातील झाडांसाठी वापरतात.
तसेच उर्वरित खत नर्सरींना विकतात. तांरांगणमध्ये राहणाऱ्या डॉ. लीना केळशीकर यांनी त्यापासून प्रेरणा घेत आपल्या वसाहतीतही हाच उपक्रम राबविण्याचे ठरविले. तांरागणचे सचिव मनोहर कटारिया यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसापासूनच येथे गांडुळ खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत झाला. त्यासाठी डॉ लता यांचीच मदत घेण्यात आली. कोरसमधील गांडुळ खत निर्मिती केंद्रात कार्यरत दोन कचरा सेवकांकरवी तारांगणमधील सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.
सहज सोपे व्यवस्थापन
कचरा व्यवस्थापनाचा हा सहज सोपा उपाय आहे. कारण गांडुळ खत प्रकल्प उभारण्यासाठी फारसा खर्च येत नाही. या कचऱ्यापासून वसाहतीत कोणतीही दरुगधी येत नाही. तो चालविण्यासाठी विजेची गरज नसते. अगदी नैसर्गिकपणे कचरा विघटीत होऊन त्यापासून खत तयार होते. सध्याच्या व्यवस्थेत कचरा व्यवस्थापनासाठी बराच द्रविडी प्राणायाम करावा लागतो. महापालिकेची घंटागाडी कचरा उचलून तब्बल १५ किलोमिटर अंतरावरील डम्पिग ग्राऊंडवर नेऊन टाकतात. त्यासाठी बरेच इंधन वापरले जाते. इतके करूनही कचऱ्याचे धड विघटन होत नाहीच, त्यामुळे शहरातील सर्व वसाहतींनी कोरस आणि तारांगणसारखेच गांडूळ खत प्रकल्प उभारून कचरा व्यवस्थापन करावे, असे आवाहन डॉ. लता यांनी केले आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.
असा आहे प्रकल्प
तारांगणमध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी दोन पेटय़ा आहेत. एक पेटी भरली की ती बंद करून दुसऱ्या पेटीत खत टाकले जाईल.  साधारण ४५ दिवसानंतर कचऱ्यापासून खत निर्मिती होण्यास सुरूवात होते आणि दर अडीच महिन्याने आपण जितका कचरा टाकला त्याच्या एक तृतीयांश खत या प्रकल्पातून मिळते. सध्या बाजारात दहा ते तीस रूपये दराने हे खत विकले जाते. तारांगणमधील कचऱ्याचे प्रमाण पाहता दर अडीच-तीन महिन्यांनी २५० ते ३०० किलो खत निर्माण होईल, अशी माहिती डॉ. लता यांनी दिली. त्या खतापासून वसाहतीत चांगले उद्यान तयार करता येऊ शकेल आणि उरलेले नर्सरी अथवा शेतकऱ्यांना विकता येईल. या प्रकल्पामुळे सोसायटीची कचऱ्याची समस्या मिटली. शिवाय सेंद्रीय पिकांना लाभदायक ठरणारे गांडूळ खत मिळाले. गांडूळ खताच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांमध्ये कचरा व्यवस्थापन करणाऱ्यांना मानधन देता येऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2015 6:51 am

Web Title: earthworms fertilizer production from wet waste
टॅग : Thane
Next Stories
1 शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वांगणीकर शाळासोबत्यांची पुनर्भेट
2 दिव्याच्या ज्वालामुखीनंतर ठाण्याचा मेकओव्हर
3 माणकोली उड्डाण पूल संलग्न रस्तेकामात नगरसेवकांचा ‘गतिरोधक’
Just Now!
X