नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार विलास मुत्तेमवार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या संपत्तीवर आम आदमी पार्टीचे मयंक गांधी यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. या संपत्तीची निवडणूक आयोगाने चौकशी करण्याची मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
खासदार मुत्तेमवार यांनी या प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या निवासी संपत्तीत मुंबईतील वरळी येथे १३५० चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटची किंमत एक कोटी १० लाख रुपये इतकी दाखवली आहे. मात्र, त्याची रेडीरेकनर किंमत पाच कोटी रुपयाहून अधिक आहे. नागपूरमधील धंतोलीतील विजयानंद सोसायटीत १०५० चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटची किंमत १५ लाख रुपये दाखवली आहे. वास्तविक त्याची रेडीरेकनर किंमत ६० लाखांहून अधिक आहे. नवी दिल्ली येथील जवाहर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत १२५३ चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटची किंमत ५५ लाख रुपये दाखवली आहे. त्याची रेडीरेकनर किंमत १.३ कोटी रुपयाहून अधिक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणी मयंक गांधी यांनी केली.