तरस प्राण्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मनीषा पवार (वय ७) या मुलीच्या नातेवाईकांना वन विभागाने ५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले.
वाघ, बिबटय़ा, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा किंवा रानकुत्रे यांच्या हल्ल्यात जखमी, मृत्युमुखी पडलेल्या किंवा कायमचे अपंगत्व आलेल्यांना वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. लोहा तालुक्यातील वडगाव येथील मनीषा पवार ही इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी शाळेतून घरी परतत असताना तिच्यावर तरस या प्राण्याने प्राणघातक हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ३० डिसेंबरला हा प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर सोनखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वन परिक्षेत्र अधिकारी दीपक शंकरवार यांनी पंचनामा, कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यावर मयताच्या नातवाईकास ५ लाख रुपये मंजूर करण्याचे आदेश जारी केले. एक लाख रकमेचा धनादेश दिल्यानंतर उर्वरित ४ लाख रुपये मृताच्या वारसाच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत ठेव म्हणून जमा करण्यात येणार आहेत. उपवनसंरक्षक जी. पी. गरड येत्या एक-दोन दिवसांत नांदेडला परतताच मनीषाचे वडील माणिका रामजी पवार यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली जाणार आहे.