अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्यात अडीच कोटींची रक्कम घेऊन त्याचा हिशेब दिला नसल्याचा कारखान्याचे अध्यक्ष, आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी आपल्यावर केलेला आरोप धादांत खोटा आहे. कारखाना चालविता न आल्याने त्याचे खापर त्यांनी आपल्यावर फोडण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप करीत, या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रल्हाद लावंड यांनी, कारखान्याशी संबंधित आपल्या आर्थिक व्यवहाराची त्यांनी चौकशी करून दोषी आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे आव्हान सिद्रामप्पा पाटील यांना दिले आहेत.
स्वामी समर्थ साखर कारखान्यातील गळीत हंगामासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या, वाहने व ऊसपुरवठा आदी कामांकरिता आपण कारखान्यातून दोन कोटी घेतली होती. परंतु त्याप्रमाणे काम केले नाही व घेतलेल्या रकमेचा हिशेबही दिला नाही, असा कारखान्याचे अध्यक्ष आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा लावंड यांच्यावर आरोप आहे. याच कारणातून लावंड यांचे अपहरण करून तीन दिवस त्यांना आमदार पाटील यांच्या सोलापुरातील वाडय़ात डांबून ठेवण्यात आले व त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरसह रोख रक्कम, मोबाइल आदी किमती वस्तू बळजबरीने काढून घेऊन त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यासह कारखान्याचे अन्य संचालक, अधिकारी व त्यांच्या हस्तकांविरुद्ध पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. यात आमदार पाटील यांनी लावंड यांनी कारखान्याची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केल्याच्या पाश्र्वभूमीवर व्यवस्थापकीय संचालक लावंड यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
ते म्हणाले, गेल्या १२ जुलैपासून आपण स्वामी समर्थ साखर कारखान्यात कार्यरत असून ऊस उत्पादक सभासद शेतकरी व कारखान्याचे हित जोपासण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र मागील तीन वर्षांपासून कारखान्याचे उसाला कमी दर दिल्याने तसेच मशिनरी घोटाळा व यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे कारखान्याला पुरेशा प्रमाणात ऊसपुरवठा झाला नाही. त्यामुळे कारखाना कार्यक्षमतेने चालू शकला नाही. तरीसुद्धा आपण प्रयत्न करून कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल संचालक मंडळाने आपले कौतुक केले होते. परंतु अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील व संचालक मंडळाची कार्यपद्धती सर्वज्ञात आहे. त्यांच्या गैरकारभारामुळेच कारखाना अडचणीत सापडला. मात्र त्याचे खापर आपल्यावर फोडले जात असल्याचा प्रत्यारोप लावंड यांनी केला आहे.
कारखान्याकडून आपण अडीच कोटी घेतल्याचे म्हणणे साफ खोटे आहे. यात आपण दोषी असल्यास जरूर कारवाई करावी, असे थेट आव्हानही त्यांनी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना दिले. यापूर्वी बारामती अॅग्रो साखर कारखान्यातही आपण कार्यरत होतो. त्या ठिकाणी आपण गैरव्यवहार केल्याचा अपप्रचार सिद्रामप्पा पाटील यांनीच सुरू केला आहे. आपण गैरव्यवहार केला असता, तर ‘बारामती अॅग्रो’ने आपणावर कायदेशीर कारवाई केली असती, अशी बाजू लावंड यांनी मांडली. स्वामी समर्थ साखर कारखाना हा २० हजार भागधारक शेतक ऱ्यांच्या मालकीचा असून तो चांगल्याप्रकारे चालला पाहिजे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.