अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोटींचे इमले रचत ठाणेकराना स्वप्नरंजनात घेऊन जाणारा ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प फसवा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना महापालिकेच्या तिजोरीत जेमतेम ४५ टक्के उत्पन्न जमा झाल्याची माहिती पुढे आली आहे. जमा झालेल्या उत्पन्नापैकी ४३ टक्के महसूल खर्च करण्यात आला असून सर्वाधिक खर्च महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार, विद्युत तसेच टेलिफोन बिलांच्या देयकांवर झाला आहे. उर्वरित खर्च शहरातील विकासकामांची बिले अदा करण्यावर झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्याचे आता उघड झाले आहे.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी गेल्या वर्षी २१६६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नव्या योजनांची स्वप्ने दाखविण्यात आली. स्थानिक संस्था कर, मालमत्ता कर, शासकीय कर, जाहिरात विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहरविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन दल, आदी विभागांमार्फत महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित उत्पन्न जमा होईल असे अपेक्षित धरण्यात आले. हा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हाच तो वास्तवदर्शी नाही, अशी टीका करण्यात आली होती. हा दावा आता खरा ठरू लागला आहे. गेल्या नऊ महिन्यांत महापालिकेच्या उत्पन्नाचा गाडा पूर्णपणे अडला असून नुकत्याच सादर झालेल्या अहवालानुसार अपेक्षित उत्पन्न जमा होऊ शकलेले नाही. महसूल शिल्लक नसल्यामुळे ठेकेदारांची बिले रोखली असून त्यापैकी काही ठेकेदारांची बिले आता देण्यात आली आहेत.