दहा वर्षांपूर्वी असलेले सोयाबीनचे भाव आजही कायम असल्यामुळे जिल्हय़ातील शेतकऱ्यांना तब्बल ३ हजार कोटींचा फटका बसला आहे. माजी आमदार पाशा पटेल यांनी ही माहिती दिली.
लोदगा ते औरंगाबाद आयुक्तालय या शेतकरी िदडीचे लातुरात आगमन झाल्यानंतर पटेल पत्रकार परिषदेत बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी आमदार टी. पी. कांबळे, नगरसेवक रवि सुडे, चंद्रकांत चिकटे, देवीदास काळे उपस्थित होते. पटेल म्हणाले, की जिल्हय़ातील ३ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे. सोयाबीन व तूर मिळून एकूण खरिपाच्या ७८ टक्के पेरा आहे. गेल्या १० वर्षांपासून सोयाबीनच्या भावात योग्य वाढ न झाल्यामुळे या वर्षी एका हंगामात शेतकऱ्याला ३ हजार कोटींचा फटका सहन करावा लागणार आहे. सोयाबीन उत्पादनात लातूर विभागाचा देशात दुसरा क्रमांक आहे. जगभरात भारतीय सोयाबीनला चांगली मागणी असताना केंद्राच्या धोरणामुळे त्याचा लाभ उठवता येत नाही. खाद्यतेलावर किमान ९० टक्के आयातशुल्क आकारावे. कापसावरील निर्यातबंधने उठवावीत. भूसुधार धोरण रद्द करावे. सोयाबीनला किमान ६ हजार रुपये क्विंटल भाव द्यावा, या मागण्यांसाठी ही िदडी असल्याचे पटेल यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी विवेकानंद चौकातून िदडीस प्रारंभ झाला. िदडीत शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले.