नाशिक जिल्ह्यातील परंतु लोकसभेसाठी धुळे मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेल्या बागलाण आणि मालेगाव या दोन तालुक्यांनी यावेळच्या निवडणुकीत अनुभवलेले ‘अर्थकारण’ याआधीच्या कोणत्याच निवडणुकीत पाहिले नव्हते. पैसे आणि मद्याचे वाटप करण्याच्या अनेक तक्रारी या निवडणुकीत करण्यात आल्या असून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण नगण्य असले तरी मागील लोकसभा निवडणुकीपासूनच इतक्या मोठय़ा प्रमाणात या दोन्ही तालुक्यांमधील निवडणुकीचे गणित बिघडले असल्याचे काही राजकीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात मागील निवडणूकही अर्थकारणामुळे गाजली होती. बागलाण आणि मालेगाव या दोन्ही तालुक्यातील मतदारांना विविध प्रकारांची प्रलोभने दाखविण्यात आल्याचा आरोप त्यावेळी विरोधकांनी केला होता. बागलाण आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये अर्थकारणाचा ‘शिरपूर पॅटर्न’ राबविण्यास सुरूवात झाल्याची चर्चा मागील निवडणुकीतच रंगली होती. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील युतीच्या एका मातब्बर नेत्यानेही प्रचारात अलिप्ततावादी धोरण स्वीकारल्याचे बोलले जात होते. युतीचे उमेदवार प्रतापदादा सोनवणे विजयी झाल्यानंतर या नेत्याने स्वत: मिरवून घेतल्यामे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले होते. यावेळच्या निवडणुकीतही अर्थकारणाच्या बाबतीत मागील निवडणुकीचीच री ओढण्यात आल्याचे दिसून आले. प्रचाराला रंग चढत गेला. तेव्हापासूनच या दोन्ही तालुक्यात अर्थकारणाची चर्चा जोर धरू लागली. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी संबंधित उमेदवाराकडे अधिक रकमेची मागणी करण्यात येऊ लागली. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मागणी पूर्ण करतानाच मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी सामिष भोजनाच्या पाटर्य़ाही रंगल्या. मतदानाच्या आदल्या दिवशी सटाण्यातील भाक्षी येथे शिरपूरच्या एका कार्यकर्त्यांस मतदारांना पैसे वाटप करताना पकडण्यात आले. त्यास बेदम चोपही देण्यात आला. परंतु यासंदर्भात पोलिसांमध्ये कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. मालेगाव तालुक्यातील काही घटनांमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. अनेक घटनांमध्ये मुद्देमाल सापडूनही गुन्हा दाखल करण्याविषयी टाळाटाळ केली गेली. पोलीस गुन्हा का दाखल करत नाहीत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
या निवडणुकीने मालेगाव शहर आणि मालेगाव ग्रामीण असे सरळ दोन गट पडले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे. त्याचे प्रत्यंतर मतदानाच्या दिवशीही दिसून आले. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रातील इतर कोणत्याही मतदारसंघापेक्षा धुळे मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजे ४९.१० टक्के मतदानाची नोंद झाली होती. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात मतदानासाठी चुरस दिसून आली.