जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी गेंदालाल साळुंखे यांना चार हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. शहरातील सरदार हायस्कुलमधील शिक्षकांचे मे २०१२ पासून वेतन मिळालेले नाही. शासनाने तेथील शिक्षकांचे एप्रिल ते सप्टेंबर २०१४ या कालावधीचे वेतन मंजूर केले आहे. त्याप्रमाणे यादी शिक्षण विभागाकडे पाठवून वेतन देण्याचे आदेश दिले होते. या यादीत तक्रारदार शिक्षकाचे नाव होते. त्या अनुषंगाने त्याने शिक्षण विस्तार अधिकारी गेंदलाल साळुंखे यांची भेट घेत सदर मंजूर वेतन हे बँकेत जमा करण्यासंदर्भात विनंती केली होती. मात्र शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने सदरच्या शिक्षकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.
या दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. साळुंखेने एक हजार रूपये कमी करत चार हजार रूपये देण्याची मागणी केली. ही रक्कम गुरूवारी देवपूर येथील निवासस्थानी साळुंखेने स्विकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने साळुंखे यास ताब्यात घेतले.
मे २०१२ पासून पगार न मिळालेल्या शिक्षकाची किती पिळवणूक होते, याचे उदाहरण आजच्या घटनेने सर्वासमोर आले. साळुखेंविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.