राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये संगणक विषयांशी संबंधित पदवी किंवा पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पीक ओसरले असून महाविद्यालये बंद करण्याकडे शिक्षण संस्थांचा कल आहे. वाणिज्य विद्याशाखेशी संबंधित या अभ्यासक्रमांना उतरती कळा लागल्याचे हे द्योतक आहे.
काही वर्षांपूर्वी अगदी वाजत गाजत खेडोपाडी व्यवसाय व्यवस्थापन पदवी (बीबीए), संगणक विज्ञान पदवी (बीसीएस), बी.कॉम. संगणक उपयोजिता (बीसीसीए) इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये उघडण्यात आली. मात्र अलीकडच्या काही वर्षांपासून महाविद्यालयांतील उपरोक्त अभ्यासक्रमांना उतरती कळा लागली आहे. कारण विद्यार्थीच नसल्याने महाविद्यालये ओसाड पडली आहेत. हमखास नोकरीचे आमिष दाखवून कळमेश्वर, कामठी, कन्हान, कोराडी भागात संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते. बीबीए अभ्यासक्रम केल्यानंतर थेट पदव्युत्तर व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल आणि बीबीए म्हणजे बी.कॉम. दर्जाची पदवी आहे, अशी जाहिरात महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाकडून केली जायची. मात्र एमबीएला प्रवेश घेण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) द्यावी लागत असल्याने त्याही अभ्यासक्रमांना बीबीएच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही. कारण बीबीएचे विद्यार्थी सीईटीमध्ये टिकत नाहीत, असे लक्षात आल्यानेच बीबीएला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही रोडावली आहे.
यासंदर्भात लोकमान्य टिळक जनकल्याण संस्था संचालित प्रियदर्शिनी इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युटर अ‍ॅप्लिकेशन अँड रिसर्च (पीआयसीएआर) मध्ये २००५-०६ पासून प्रवेशच न झाल्याचे उदाहरण बोलके आहे. हे महाविद्यालय २००२ मध्ये सुरू झाले आणि दोन वर्षांतच विद्यार्थी मिळेनासे झाल्याचे संस्थेच्या सचिव आभा चतुर्वेदी यांनी विद्यापीठाला पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्थेने लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेच्या पीआयसीएआरला ६० जागांची परवानगी दिली. त्यानंतर संस्थेच्याच प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात एमसीएसुद्धा सुरू करण्यात आले. त्यामुळेच संस्थेने पीआयसीएआरचे प्रवेश थांबवल्याचे संस्थेच्या सचिव आभा चतुर्वेदी यांनी विद्यापीठाला कळवले.
 विद्यापीठाला संबंधित महाविद्यालयाच्या विनंतीची दखल घेण्यासाठी दहा वषार्ंचा कालावधी घेऊन महाविद्यालय बंद करण्याच्या बाबतीत डॉ. पी.के. बुटे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीच समिती स्थापन केली. महाविद्यालयात एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश न घेतल्याने संस्थेने निरंतर संलग्निकरणासाठी विद्यापीठाला अर्जच केला नसल्याची मुद्दा नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेत चर्चेला आला होता.