महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने वाई परिसरात मोठे शैक्षणिक विश्व उभारावे. या परिसरात शिक्षणाला पोषक वातावरण आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.
पांडेवाडी (ता. वाई) येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने मोठी जागा खरेदी केली असून, या ठिकाणच्या संस्थेच्या फलकाचे अनावरण व परिसरात वृक्षारोपण पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विश्वास देवल, सचिव रवींद्र देशपांडे, विश्वस्त प्रकाश करंदीकर, संचालक पोपटलाल ओसवाल, शिवाजी फेंगसे आदी उपस्थित होते.
पांडेवाडी (ता. वाई) येथे संस्थेने जागा खरेदी केली आहे. परंतु संस्थेने येथे आणखी जागा खरेदी करावी आणि मोठे शैक्षणिक संकुल उभारावे असे सांगून पाटील म्हणाले, या परिसराला पूर्वीपासून शैक्षणिक व ज्ञानदानाची परंपरा आहे. शैक्षणिक वातावरण आहे. त्यामुळे येथील या संस्थेचे संकुल लवकर नावलौकिक मिळवेल. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
संस्थेचे कार्याध्यक्ष विश्वास देवल म्हणाले, स्त्रियांना शिक्षण देणे व स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे हे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे काम आहे. या ठिकाणी चांगली निवासी इंग्रजी माध्यमाची शाळा उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी संचालक पोपटलाल ओसवाल यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाला, कार्य उपाध्यक्ष भालचंद्र भेडसगावकर, वाई पंचायत समितीचे उपसभापती शंकर शिंदे, पांडेवाडीच्या सरपंच सुनंदा फणसे, भोगावचे सरपंच सतीश येवले, बरखडवाडीचे सरपंच अनिल पवार, मेणवलीच्या सरपंच जयश्री चौधरी उपस्थित होत्या. शालेय समितीचे सदस्य विश्वास पवार यांनी परिचय करून दिला. आजन्म सेविका प्रज्ञा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका रुक्मिणी भोमे यांनी आभार मानले. या वेळी डॉ. शिवाजी कदम, डॉ. जयश्री जगताप, कविता खटावकर, कैलास वैद्य, नील ढवण आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.