प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या बीएमएस, बीएमएम, बीएस्सी-आयटी आदी शाखांना विद्यार्थ्यांकडून असलेल्या जोरदार मागणीचा फायदा मुंबईतील काही प्रतिष्ठीत महाविद्यालयांनी उठवण्यास सुरुवात केली असून व्यवस्थापन कोटय़ातील या जागांवरील प्रवेश चक्क लिलावाप्रमाणे बोली लावून करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. बारावीला जितके गुण कमी तितकी जागेची किंमत मोठी. त्यामुळे उच्चशिक्षणाच्या बाजारात या अभ्यासक्रमांकरिता ३० हजारापासून अडीच-तीन लाख रुपयांपर्यंत बोली लावली जात आहे.
व्यवस्थापन कोटा गरजू विद्यार्थ्यांकरिता असतो. पण, आपल्या अखत्यारित असलेल्या या जागांचे प्रवेश अनेक महाविद्यालये नियम डावलून अव्वाच्या सव्वा डोनेशन आकारून करीत असतात. आता काही ठराविक विषयांकरिता विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रेझचा फायदा घेत चक्क लिलाव पद्धतीने जागांचे खरेदीविक्री व्यवहार करण्याचा प्रकार महाविद्यालयांनी सुरू केला आहे. अर्थात हा लिलाव उघडपणे नसून चार भिंतीआड बंद केबिनमध्ये केला जातो.
व्यवस्थापन कोटय़ातून डोनेशन घेऊन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना एकाच वेळी संस्थाचालक आणि प्राचार्याच्या भेटीला बोलाविले जाते. एकेकाला आत बोलवून त्यांच्याशी चर्चा केली जाते. अमुक या जागेवरील पैशासाठी किती मोजणार, असा थेट सवालच पालकांना विचारला जातो. जे पालक या बैठकीत सर्वाधिक पैसे देण्यास तयार होतात, त्यांच्याशी नंतर संपर्क साधून प्रवेश निश्चित केला जातो.
दादरमधील एका जुन्या व प्रतिष्ठीत महाविद्यालयात प्रवेशासाठी गेलेल्या एका पालकांना नुकताच असा अनुभव आला. या पालकांना आपल्या मुलीसाठी संबंधित महाविद्यालयात बीएमएस शाखेला प्रवेश हवा होता. त्यासाठी त्यांनी डोनेशन भरण्याचीही तयारी दर्शविली होती. संस्थाचालक आणि उपप्राचार्याच्या झालेल्या या बैठकीत त्यांनी प्रवेशासाठी २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यावर समोरून हे पैसे थोडे वाढवून देता येतील का, अशी विचारणा झाली. ‘आपण त्याला होकार दर्शविला. नंतर कळवितो, असे सांगून ही बैठक आटोपती घेण्यात आली. नंतर महाविद्यालयाने संपर्क साधून पुन्हा भेटायला बोलाविले. त्या बैठकीत आणखी पाच हजार वाढवून देण्यास तयार झालो. पण, माझ्या मुलीऐवजी या भागात राहणाऱ्या एका प्रतिष्ठीत मराठी अभिनेत्रीच्या ओळखीतील पालकांना प्रवेश देण्यात आला,’ अशा शब्दांत या पालकांनी आपली कैफियत मांडली. ‘पैसे देण्यास तयार असतानाही मला प्रवेश का नाकारला,असे विचारले असता महाविद्यालयाने थातुरमातूर उत्तर देऊन आपल्याला उडवून लावले,’ अशी तक्रार त्यांनी केली. हे पालक संबंधित प्रकाराबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.
कांदिवलीतील एका महाविद्यालयात तर बीएमएमसाठी अडीच लाख रुपयांची बोली लावली गेली. याच महाविद्यालयात बीएमएससाठी पावणेदोन लाखांची बोली लावून प्रवेश करण्यात आला आहे. काही महाविद्यालये आपल्याकडे पुरेसे शिक्षक असो वा नसो प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरतात. नंतर या वाढीव प्रवेशांना विद्यापीठाकडून मान्यता मिळविली जाते. पुरेसे शिक्षक, शैक्षणिक सुविधा नसताना जादा प्रवेश करणाऱ्या महाविद्यालयांना चाप लावण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यासाठी महाविद्यालयांना सरसकट जागा वाढवून मिळणार नाहीत, अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप करंडे यांनी व्यक्त केली.