इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासहीत महापालिका आणि विमा रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदमुळे रुग्णालयातील रुग्ण सेवा विस्कळीत झाली. उद्या, बुधवारपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ३०० निवासी डॉक्टर्स संपावर जाणार आहेत. दरम्यान वैद्यकीय मंत्री आणि संचालकांनी संप मागे घ्या अन्यथा कारवाई करू असा इशारा दिल्याने हा संप अधिक चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत. मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आज प्रवेशद्वारासमोर आम्हाल न्याय द्या अशी मागणी करीत निदर्शने करून ‘काम बंद’ आंदोलन केले.
निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी राज्यातील विविध शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील १६० निवासी डॉक्टर आज सकाळपासून संपावर गेल्याने रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडली. मेयोच्या बाह्य़ रुग्ण विभागात रुग्ण होते मात्र निवासी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना बराच काळ थांबावे लागले. अनेक वॉर्डांमध्ये रुग्णांची हेळसांड झाली. मेयोमध्ये सकाळी ४ शस्त्रक्रिया होणाऱ्या होत्या मात्र त्यापैकी केवळ २ झाल्याची माहिती निवासी डॉक्टरांनी दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर संपावर गेले असून त्यांनी आज कामबंद आंदोलन केले.  राज्य सरकारच्या २००९ च्या आदेशानुसार स्टायपँडमध्ये वाढ करण्यात यावी, ओबीसी विद्याथ्याची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यात यावी, निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने कठोर पावले उचलावी इत्यादी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. पहिल्या दिवशी मेयोचे निवासी डॉक्टर संपावर गेले असून उद्या बुधवारपासून मेडिकलमधील २५० निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्यामुळे दोन्ही शासकीय रुग्णालयातील व्यवस्था कोलमडणार असून रुग्णांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. मेडिकलमधील निवासी डॉक्टरांच्या संघटनेमध्ये दोन गट असून त्यातील एका गटातील काही निवासी डॉक्टरांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मेडिकल आणि मेयो प्रशासनाने रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी विभाग प्रमुखांना सूचना देऊन कोणीही सुटीवर जाऊ नये असे निर्देश देण्यात आले. या निवासी डॉक्टरांच्या संदर्भात मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी सांगितले, निवासी डॉक्टर संपावर गेले असले तरी फारसा फरक पडला नाही.
नेहमीप्रमाणे बाह्य़ रुग्ण विभाग सुरू असून प्रत्येक वॉर्डामध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि प्राध्यापक लक्ष ठेवून आहेत. रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. संप मिटविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.