News Flash

केंद्रासह राज्यातील सरकार दुष्काळ निवारणात प्रभावहीन

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी राज्य व केंद्र सरकार प्रभावी पावले उचलत नसल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. दुष्काळामुळे पिके हातची

| April 3, 2013 02:33 am

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी राज्य व केंद्र सरकार प्रभावी पावले उचलत नसल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. दुष्काळामुळे पिके हातची गेलेल्या शेतकऱ्यांना पिकांबद्दल किमान मोबदला देण्याची योजना राबवावी, असे आवाहन त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना उद्देशून केले. अशा प्रकारची योजना भाजपची केंद्रात सत्ता असताना तयार केली होती, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती गंभीर आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करून भाजपप्रणीत राज्यांप्रमाणे शून्य टक्के व्याजाने नवीन कृषी कर्जे महाराष्ट्रात दिली पाहिजेत. केंद्राच्या रोजगार हमी योजनेची कार्यकक्षा वाढवून ही योजना शेतीसाठीही लागू केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेला पिण्यासाठी म्हणून टँकरद्वारे पुरवण्यात येणारे पाणी जनावरांनी पिण्याच्या दर्जाचेही नसल्याचे सांगून, भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात पुन्हा दुष्काळी स्थिती उद्भवू नये, यासाठी दीर्घ मुदतीच्या योजना राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
केंद्रात मुदतपूर्व निवडणुका होण्याच्या शक्यतेवर ते म्हणाले, की आम्ही स्वत:हून केंद्र सरकार अस्थिर करणार नाही. ते स्वत:हून पडले तर तो भाग वेगळा. समाजवादी पक्ष भाजपसोबत येईल का? या प्रश्नावर ते म्हणाले, की आम्ही तसा विचार केलेला नाही. परंतु एनडीए आघाडीचा विचार मात्र करीत आहोत. केंद्र सरकार आर्थिक आघाडीवर व भ्रष्ट्राचार थांबविण्यात अयशस्वी ठरले. या सरकारकडे दृष्टीच नाही, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळय़ाचा उल्लेख करून यासंदर्भात आपण आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीटंचाईमुळे महाराष्ट्रात आयपीएल सामने होऊ नयेत, अशी मागणी राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. दुसरीकडे भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. या विसंवादाबद्दल विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना राजनाथसिंह यांनी, याबद्दल आपणास काही बोलायचे नाही. परंतु हा महाराष्ट्रातील प्रश्न असल्याने पक्षाची राज्य कार्यकारिणीच याबद्दल मत तयार करील, असे सांगितले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर गोविंदाचार्य यांनी केलेल्या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले.
भोकरदनला सभा
दरम्यान, सोमवारी रात्री भोकरदन येथे जाहीर सभेत केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने मराठवाडय़ासह राज्यातील दुष्काळी भागास मदत करताना हात आखडता घेत असल्याचा आरोप राजनाथसिंह यांनी केला. दुष्काळी मराठवाडय़ात येण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनाही वेळ मिळाला नाही. काही मोजक्या उद्योगपतींना केंद्राने पाच लाख कोटींची करसवलत दिली. परंतु दुष्काळ हटविण्यासाठी नदीजोड प्रकल्पास पाच लाख कोटी निधी मात्र उपलब्ध करून दिला नाही, असा आरोप त्यांनी केला. खासदार गोपीनाथ मुंडे यांनीही दुष्काळी भागात उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:33 am

Web Title: effectiveless work form state government for helping the drought affacted area
Next Stories
1 नगराध्यक्षांच्या पतीसह पाच जणांची माजी नगराध्यक्षास बेदम मारहाण
2 ‘लाल मातीतील कुस्तीला समाजानेच प्रोत्साहन द्यावे’
3 पाथरीत ९ लाखांचा गुटखा जप्त
Just Now!
X