पुढील महिन्यात वाजतगाजत गणेशाचे आगमन होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘एक वॉर्ड एक गणपती’ची रुजुवात करावी, याकडे जाणकार नागरिकांनी लक्ष वेधले आहे. ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच’ असा स्वातंत्र्याचा मूलमंत्र देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी समाजात प्रबोधन व्हावे, समाजकार्य, देशकार्य व्हावे म्हणून गणेशोत्सव हा सार्वजनिक उपक्रम राबवण्याचा मार्ग दाखवला. अनेक गणेशोत्सव मंडळे भव्यदिव्य सजावटीसह विविध उपक्रम राबवतात, परंतु काही ठिकाणी उत्सवाचे स्वरूप समाधानकारक दिसत नसल्याने विशेष कार्यकारी अधिकारी सुरेश रेवतकर यांनी ‘एक वॉर्ड एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे.
यामुळे पैशाची बचत होईल. सुरक्षेचा ताण व इतर अनावश्यक खर्चाची बचत होईल. उरलेल्या रकमेचा उपयोग गरीब व होतकरू मुलांकरिता करावा. सार्वजनिक ठिकाणी वावरताना स्वच्छतेच्या दृष्टिकोणातून व्यसनमुक्ती, अभ्यासाचा ताण, मानसिक ताणतणाव यापासून मुक्ती, खेळ, क्रीडा प्रकाराची माहिती, प्रबोधनपर भाषणे ठेवावीत. गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव काळात विविध उपक्रमे राबवताना आरटीओ, पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून अपघात कसे टाळता येतील यासाठी शिबिरे आयोजित करावीत. नवीन परवानाधारकांना विशेषत: महिलांना प्रश्नमंजूषासारख्या उपक्रमात सहभागी करण्यात यावे. आरोग्यविषयक शिबिरांबरोबरच लहान मुलांना संस्काराची ओळख, लोकगीत, लोककला, राष्ट्राप्रति कर्तव्य इत्यादीवर प्रश्नमंजूषासारखे कार्यक्रम आयोजित करावेत. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने जमा वर्गणीच्या दहा टक्के रक्कम राखीव ठेवून सेना दिवस, मुख्यमंत्री मदतनिधीकरिता पाठवावी. प्रत्येक गणेश मंडळाने पावतीच्या मागे गेल्या वर्षीच्या खर्चाचा अहवाल छापून वर्गणीदारांना देण्याची पद्धत अंगीकारावी. यामुळे वर्गणी देण्यास संकोच होणार नाही. परिसरात स्वच्छता ठेवावी, महाप्रसादाच्या निमित्ताने अन्नाची नासाडी टाळावी, असे आवाहन विशेष कार्यकारी अधिकारी सुरेश रेवतकर यांनी केले आहे.