27 September 2020

News Flash

करमाळ्याजवळ दलित महिलांसह आठजणांवर प्राणघातक हल्ला

दलित विवाहित महिलेची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून पाच दलित महिला व तीन पुरुषांवर तलवारी, काठय़ा, सळई, कुऱ्हाड आदी शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. करमाळा

| December 12, 2012 08:54 am

दलित विवाहित महिलेची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून पाच दलित महिला व तीन पुरुषांवर तलवारी, काठय़ा, सळई, कुऱ्हाड आदी शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. करमाळा तालुक्यातील जिंती येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांखाली मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणी मुरलीधर ओंबासे, विमल बलभीम धेंडे, मंगल नंदू शेलार, रेखा बबन जगताप व सविता सतीश धेंडे या दलित महिला जिंती गावाबाहेर रस्त्याच्या कडेला पडलेले सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असताना त्यापैकी एका महिलेची छेडछाड झाली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बलभीम शिवाजी धेंडे, सतीश शिवाजी धेंडे, विनोद वसंत शेलार या तिघाजणांच्या अंगावर २०-३० जणांचा जमाव चालून आला. यातील काहीजणांच्या हातात तलवारी, काठय़ा, सळई, कुऱ्हाड आदी शस्त्रे होती. या जमावाने पाच महिलांसह तीन पुरुषांवर सशस्त्र हल्ला केला. हा हल्ला होत असताना अन्य कोणाही गावकऱ्याने मारेकऱ्यांना रोखण्याचे धाडस दाखविले नाही. हल्लेखोरांनी या पाच महिला व त्यांच्या घरातील पुरुषांना रिंगणात घेऊन व त्यांच्या अंगावरचे कपडे काढून जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच जिंतीच्या सरपंच सवितादेवी राजेभोसले यांनी आपल्या वाहनाच्या चालकाला वाहनासह घेऊन जखमींना आणण्यासाठी पाठवून दिले. परंतु वाहनचालकालाही मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेतील सर्व आठजण मदतीविना सुमारे दीड तास विव्हळत पडून होते. नंतर सरपंच सवितादेवी राजेभोसले या स्वत: वाहन घेऊन तेथे पोहोचल्या व जखमींना सायंकाळी उशिरा करमाळा कुटीर रुग्णालयात दाखल केले.
या घटनेशी जिंती ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण जोडले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राजेभोसले पॅनेलला बहुमत मिळाले, तर बागल गटाला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर मकाई सहकारी साखर कारखान्यातील तिघा कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले होते. परंतु नंतर गावातील राजकारण धुमसत राहिले. त्याची परिणती दलित महिला व पुरुषांवरील प्राणघातक हल्ल्यात झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी दत्ता गायकवाड, मकाई साखर कारखान्याचे माजी संचालक छगन भोसले, धर्मा भोसले, जावेद मुलाणी, हुसेन मुलाणी, उदय छगन भोसले आदींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 8:54 am

Web Title: eight persons including dalit woman attacked in karmala
Next Stories
1 औराद-पंढरपूर बसमध्ये बेवारस रेडिओ सापडल्याने खळबळ
2 लांडग्यांच्या हल्ल्यात ५ हजार कोंबडय़ा मृत्यूमुखी,पाच लाखांचे नुकसान
3 परीक्षांमधील गोंधळानंतर आता पेपर फुटीचा प्रकार?
Just Now!
X