मतदान कधी करतो म्हणून आतुर झालेले नागरिक गुरुवार सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावून होते. डोंबिवलीत सकाळी साडेसात वाजल्यानंतर रस्त्यावर जत्रोत्सव असल्याचे चित्र दिसत होते. अशीच परिस्थिती कल्याण, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, मुंब्रा, कळवा परिसरात होती. विशेष म्हणजे वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, नवतरुण मतदार मोठय़ा प्रमाणात सकाळीच मतदानासाठी बाहेर पडला होता. दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे २४ टक्के मतदान झाले होते.
कल्याण ग्रामीण भागात सकाळच्या वेळेत मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. गावातील नेतेमंडळी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र होते. ग्रामीण भागात दहशतीच्या बळाचा वापर होण्याची शक्यता विचारात घेऊन गावातील मतदान केंद्रांवर, मुख्य रस्त्यांवर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कल्याणमध्ये मुस्लीमबहुल विभागात सकाळपासून मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडले होते. अन्य भागांत मात्र मतदान केंद्रांबाहेर तुरळक उपस्थिती दिसत होती. मुंब्रा भागात सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये महिला मतदारांची उपस्थिती लक्षणीय होती. डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सकाळी प्रभात शाखेवरून परतताना संघाच्या गणवेशात मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आणि शरद पवारांच्या ‘अर्धी चड्डी’ वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. कल्याणमध्ये मुस्लीम मोहल्ल्यातील १०५ वर्षांच्या बिबी मरिअम अब्दुल लतीफ डोन वृद्धेने मतदान केले. मतदान केंद्रातून मतदान करून बाहेर पडलेले काही नवतरुण मतदार मला मोदींचे ‘कमळ’ यंत्रामध्ये दिसलेच नाही, असे सांगताना दिसत होते.  काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये काही प्रमाणात गोंधळ दिसून आला. उत्तर भाषिक, गुजराती भाषिक मंडळी मोठय़ा संख्येने रस्त्यावर दिसत होती. उन्हाचा पारा चढला तरी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.