जाहीर सभा, चौक सभा, जाहीरनामे, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया भेटीगाठी आदी प्रचारांच्या आयुधांबरोबरच आता एक वेगळ्या प्रचाराने वेग घेतला असून साखळी प्रचाराचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. पक्षाच्या एका कार्यकर्त्यांने केवळ दहा किंवा वीस मतदारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना पटविणे इतकेच काम या साखळी प्रचारात पक्षनेतृत्वाकडून दिले जात आहे. यासाठी बचत गटांचे फार मोठे साहाय्य घेतले जात असल्याचे दिसून येते. ज्या पक्षांकडे कार्यकर्त्यांची फौज व बचत गट आहेत त्यांनी ही व्यूहरचना केली आहे. त्यामुळे त्या पक्षांना हा साखळी प्रचार करणे शक्य असून इतर पक्षांची कुणी कार्यकर्ता देता का कार्यकर्ता अशी स्थिती झाली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराच्या शेवटच्या आठवडय़ाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा आता कुठे उडू लागला असल्याचे दिसून येते. पुढील आठवडय़ातील सोमवारी प्रचाराच्या तोफा थंड होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी प्रचाराचे वेगवेगळे फंडे आचरणात आणण्यास सुरुवात केली असून मोठय़ा नेत्यांच्या जाहीर सभांबरोबरच चौक सभा, रोड शो आता मोठय़ा प्रमाणात होणार आहेत.
सोशल मीडिया हाताळण्यासाठी बहुतांशी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आऊटसोर्सिग केले आहे. त्यामुळे सोशल मीडिया वॉर ऐन रंगात आला असून प्रचार-अप्रचार जोरात सुरू आहे. सकृत्दर्शनी नवी मुंबईत पंचरंगी निवडणूक असल्याचे दिसत असले तरी ही निवडणूक शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांत होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे या दोन पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी परंपरागत प्रचाराबरोबरच साखळी प्रचाराला महत्त्व दिले आहे. त्यासाठी एका कार्यकर्त्यांला दहा ते वीस मतदारांची जबाबदारी व त्यांचा खर्च देण्यात आला आहे. नवी मुंबईत ग्रामीण, शहरी आणि झोपडपट्टी अशा तीन भागांत मतदार विभागला गेला आहे.
त्या मतदाराला पटविण्याचे काम हे पक्षाचे सरदार करणार आहेत. त्यासाठी या सरदारांना दहा ते वीस हजार रुपये पॉकेटमनी देण्यात आला असून त्याने केवळ त्या मतदारांवर नजर ठेवण्याचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी मुंबई पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असून या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक आणि त्यामुळे कार्यकर्ते आहेत. त्यानंतर शिवसेनेचा क्रमांक लागत असून पालिकेतील विरोधी पक्षाची जबाबदारी या पक्षावर आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते येत्या दहा दिवसांत वीस मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक कसे वाईट आहेत हे या मतदारांवर बिंबविण्याचे काम विरोधक करणार असून राष्ट्रवादीशिवाय या शहराला पर्याय नाही हे पटवून देण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते करणार आहेत. त्यासाठी वीस मतदारांची यादी त्या सरदारांच्या खिशात देण्यात आली आहे.