उरण शहरातील वाहतूक कोंडीमुळे शहरातून ये-जा करणारे, राहणारे तसेच खरेदीसाठी येणारे नागरिक त्रस्त झाले असून, शहरातील ही वाहतूक कोंडी वाढतच  असून यामध्ये सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी येणाऱ्या वाहनांचीही भर पडली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना कोण करणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.मुंबई व नवी मुंबईनंतर औद्योगिकदृष्टय़ा वाढणाऱ्या उरण शहरातील नागरीकरण व व्यवसायही वाढला आहे, तर दुसरीकडे आर्थिक सुबत्तेमुळे दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांचीही संख्या वाढलेली आहे. त्यामुळे चारचाकी वाहने दुकानाच्या दरवाजात उभी करून खरेदी करण्यात येत असल्याने अनेकदा उरण शहरात वाहतूक कोंडी होत आहे. एखादे चारचाकी वाहन रस्त्यात उभे राहिल्यानंतर वाहतूक कोंडी झाल्यानंतर दुचाकी वाहनचालकांकडून दोन्ही रस्ते अडवून रस्ते जाम करीत असतात. त्यावेळी चौकात असलेले वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आक्षेप ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांकडून नोंदविले आहेत. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उरण नगरपालिकेने योजना राबविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा पाठपुरावा झाला नसल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे.