लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्यानंतर जनतेशी संपर्क साधण्यासाठी पक्षांकडून पदयात्रा आणि मेळावे आयोजित केले जात आहेत. उमेदवारांचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध प्रकारचे साहित्य तयार केले जात आहे. निवडणुकीच्या माध्यमातून मुद्रणालये आणि ऑफसेट मुद्रणाच्या व्यवसायाला मोठय़ा प्रमाणात काम मिळाले आहे.
महिन्यावर निवडणूक आलेली असताना अनेक राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार अजूनही ठरलेले नाहीत. घोषित झालेले आणि अपेक्षित असलेल्या उमेदवारांची पत्रके आणि इतरही प्रचार साहित्य मुद्रणाच्या कामासाठी अतिशय कमी वेळ असल्यामुळे मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांना आणि व्यावसायिकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. निवडणुकीच्या काळात मुद्रण व्यवसायात ४० ते ५० कोटी रुपयांची उलाढल होत असल्याचे मुद्रण व्यावसायिकांनी सांगितले.
विदर्भात १० मार्चला दहा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात विविध राजकीय पक्षांना प्रचारासाठी निवडणूक साहित्य लागणार असल्यामुळे त्यांची तयारी सुरू झाली आहे. एकाच वेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रचार साहित्यासाठी मुद्रणालय आणि ऑफसेट व्यावसायिकांना मोठय़ा प्रमाणात काम मिळाले आहे. प्रचारासाठी केवळ  २७ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे घरोघरी पत्रके, हॅन्डबिले, मतदानाचे ओळखपत्र, बिल्ले पोहोचविणे गरजेचे आहे.  लवकरात लवकर त्याची छपाई करण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते मुद्रणालय व्यावसायिकांच्या मागे लागले आहेत. कसेही करून आजच्या आज पत्रकाची छपाई करून देण्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा देण्यासाठी उमेदवार तयार झाले आहेत. काही प्रमुख राजकीय पक्षांनी मात्र निवडणुकीची तारीख घोषित होताच मुद्रणालयाकडे कामे दिली असून अनेक उमेदवारांच्या नावांची पत्रके तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
 काही अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळायचे असले तरी त्यांनी त्यांनी प्रचार साहित्य छपाईसाठी दिले आहे. शहराच्या विविध भागात उमेदवारांना फिरायचे असल्यामुळे त्यादृष्टीने पक्षांनी सकाळ, सायंकाळ प्रचाराच्या दृष्टीने व्यूहरचना तयार केली आहे. विदर्भातील दहा मतदार संघातील भाजप, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, रिपब्लिकन, बहुजन समाज पक्षांनी विविध प्रचार साहित्याची मागणी केली केल्यामुळे मुद्रण व्यावसायिकांकडे कामाचा बोझा वाढला आहे. बाजारात काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष-शिवसेना-आरपीआय, बहुजन रिपब्लिकन पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या छायाचित्रांना व पक्ष चिन्ह साहित्याला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. यावर्षी आम आदमी पक्षाने सर्वात प्रथम उमेदवारांची घोषणा केली आहे. आपचे चिन्ह असलेल्या झाडूची मोठय़ा प्रमाणात मागणी वाढल्यामुळे ग्रामीण भागात झाडू तयार करणाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळाला आहे.
एकीकडे जरीकाठाच्या व्हीआयपी उपरण्यांनी उमेदवारांवर मोहिनी घातली असली तरी दुसरीकडे विविध राजकीय पक्षांच्या प्रचारात साहित्याची मागणी वाढली आहे. भाजप- शिवसेना- आरपीआय, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष तसेच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांची छायाचित्रे असलेले झेंडे व फलकांना विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.  शहरातील काही मुद्रण व्यवसाय करणाऱ्यांकडे संपर्क केला असता त्यांनी सांगितले, निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे प्रचाराचे साहित्य प्रिटींगला आले आहे. जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या मुद्रणाचे काम  संबंधित मुद्रण व्यवसायाकडे दिले जाते. मात्र, अपक्ष उमेदवारांचे काम ऐनवेळेवर येत असल्याने कामाचा बोझा वाढतो. मुद्रण व्यवसायात कागद, शाई आणि साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. संगणकामुळे काम सोपे झाले असले तरी माणसांची कमी असल्यामुळे या दिवसात कामाचा ताण वाढतो.