पूर्वी निवडणूक काळात उमेदवारांनी घेतलेल्या प्रचार सभा, प्रचार रॅली आणि प्रचार साहित्याच्या वाटपावरून उमेदवारांची ओळख मतदारांपर्यंत पोहोचत होती. त्यातून उमेदवाराच्या निर्माण होणाऱ्या छबीवरून मतदार उमेदवारांना मतदान करत होते. मात्र माहिती महाजालाच्या या काळात ही पद्धत आता हळूहळू कालबाह्य़ झाली असून उमेदवारांची सोशल नेटवर्किंगवरील माहिती आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील तपशिलावरून उमेदवारांच्या चारित्र्याची खरी ओळख मतदारांपर्यंत सहज उपलब्ध होऊ लागली आहे. माहितीच्या महाजालापासून दूर असलेल्या सामान्य मतदारांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी तरुणांच्या सामाजिक संस्था सज्ज झाल्या असून कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातील तरुणांचे गट या माध्यमातून जनजागृती करत आहेत.
महायुतीतील फूट आणि आघाडीतील बिघाडीमुळे आणि छोटय़ा-मोठय़ा पक्षांच्या उमेदवारांमुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रस्थापित आणि नव्या उमेदवारांची भाऊगर्दी उसळल्याचे चित्र आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे या पाच पक्षांनी आपापले उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये उभे कल्याने पाच मोठय़ा पक्षांची पंचरंगी लढत होत आहे. तसेच अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचे उमेदवारही मोठय़ा प्रमाणात या निवडणुकीमध्ये सहभागी झाले आहेत. काही मतदारसंघांमध्ये १५ ते २० हून अधिक उमेदवार निवडणुकीमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे एवढय़ा सगळ्या भाऊगर्दीमध्ये आपण नेमके कोणाला मतदान करायचे, असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. प्रचारामध्ये सगळेच उमेदवार आपली चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांची खरी ओळख काय, हेच लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये उभे असलेले नेमके उमेदवार कोण? त्यांची नेमकी पाश्र्वभूमी काय? त्यांचा व्यवसाय, शिक्षण, संपत्ती आणि त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे या सर्वाची इत्थंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून त्यासाठी तरुणांच्या सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत. कल्याणच्या यंग इंडिया संस्थेने यासाठी प्रयत्न सुरू केले असून लोकसभा निवडणुकीतही त्यांनी तरुणांच्या संवादाच्या कार्यक्रमातून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली होती. तसाच प्रयत्न विधानसभा निवडणुकीच्या काळातही ते करीत आहेत.
उमेदवारांची माहिती पोहोचवण्याचा
प्रामाणिक प्रयत्न..
निवडणूक काळात उमेदवार आपली वैयक्तिक माहिती प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला कळवत असतात. ही माहिती सामान्य मतदारांना बातम्यांच्या माध्यमातून कळत असली तरी प्रस्थापित उमेदवारांचीच माहिती लोकांना मिळते. मात्र अन्य उमेदवार कोण हे काहीच कळू शकत नाही. निवडणूक आयोगाने सर्व उमेदवारांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची एक प्रत माहिती महाजालाच्या माध्यमातून लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र अनेक मतदारांना ते पाहणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी या उमेदवारांच्या माहितीचे संकलन करून ते मतदारांपर्यंत तटस्थपणे पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमची संस्था करते. लोकसभा निवडणुकीच्या काळात युवकांमधील संवादाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला होता. तसाच उपक्रम आताही राबवीत असल्याची माहिती यंग इंडिया संस्थेच्या हर्षद कुलकर्णी यांनी दिली.
मतदारांना जागृत करण्याचे विविध मार्ग..
यंग इंडियाप्रमाणेच विविध माध्यमांतून मतदान करण्याचे आवाहन विविध संस्था करत आहेत. त्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग संस्था आदींचा समावेश आहे. कळव्यातील नवनिर्माण संस्थेने कळवा शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर्सच्या माध्यमातून आमदार कसा असावा याचे निकष मांडून जागृती केली आहे. तर समान्य तरुणांमध्येही उमेदवारांचे राजकीय चारित्र्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असून तेही सोशल नेटवर्किंगवरून उमेदवारांची माहिती जमवू लागले आहेत.