चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील विविध उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे लेखे विहित पध्दतीने न ठेवल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १६ उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या ४८ तासाच्या आत यासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, खर्चात महायुतीचे हंसराज अहीर, कॉंग्रेस आघाडीचे संजय देवतळे व आपचे अ‍ॅड. चटप यांनी आघाडी घेतली आहे.
निवडणूक आयोगाचे जोडपत्र ७४ व परिच्छेद ४.३.३ अन्वये वरील उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी १६ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्च विभागाचे मनोहर आवारी, महेश अवताळे व त्यांचे सहकारी उमेदवारांच्या खर्चाचे लेखे तपासण्याचे काम करीत आहे. ३० मार्च २०१४ ला निवडणूक निरीक्षक बी.के. मिना यांच्यासमोर २८ मार्च २०१४ पर्यंतचे खर्च लेखे तपासले असता उमेदवारांच्या खर्चामध्ये त्यांनी सादर केलेल्या परिशिष्ट १४ व निवडणूक खर्च कार्यालयाचे श्ॉडो रजिस्टर परिशिष्ट ११ मधील खर्च तफावत असल्याने ३ उमेदवारांना नोटीस देण्यात आल्या. महायुतीचे हंसराज अहीर परिशिष्ट १४ प्रमाणे ४ लाख ५१ हजार ९१३ रुपये, तर परिशिष्ट ११ प्रमाणे ७ लाख ३५ हजार ३० रुपये, आपचे अ‍ॅड.वामनराव चटप परिशिष्ट १४ प्रमाणे २ लाख ९० हजार ३९० रुपये, तर परिशिष्ट ११ प्रमाणे ४ लाख २० हजार ६२ रुपये व संजय देवतळे परिशिष्ट १४ प्रमाणे १ लाख २८ हजार ९९० रुपये, तर परिशिष्ट ११ प्रमाणे १७ लाख ८१ हजार ७९६ रुपये, असा खर्चाचा तपशील आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक मिना यांच्याकडे खर्चाचा अहवाल तपासणीकरिता मागविण्यात आला असता अतुल अशोक मुनगीनवार, संजय वामनराव देवतळे, प्रमोद मंगरूजी सोरते, विनोद दीनानाथ मेश्राम, अशोक विठोबा खंडाळे, नामदेव माणिकराव शेडमाके व संजय निळकंठ गावंडे यांनी २८ मार्चपर्यंत खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या. आयोगाच्या सूचनेनुसार विहित नमुन्यात लेखे ठेवण्यात न आल्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी प्रथम बॅंक खात्यात रक्कम जमा करून व्यवहार न केल्याने नंदकिशोर रंगारी, मो.इखलाक, प्रमोद सोरते, विनोद मेश्राम, पंकजकुमार शर्मा, अशोक खंडाळे, नामदेव शेडमाके, नितीन पोहाणे, सिराज पठाण, रोशन घायवान व सिध्दार्थ राऊत या उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसचे उत्तर ४८ तासात देणे बंधनकारक आहे. विविध पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीच्या पूर्वीच खर्च सादर करतांना कशा पध्दतीने सादर करायचा याचे निर्देश दिले होते, परंतु उमेदवारांकडून त्याचे पालन होतांना दिसत नाही. तसेच सर्व खर्च बॅंकेच्या कोणत्याही एकाच खात्यातून करायचा होता. मात्र, उमेदवारांना खर्च सादर करतांना टाळाटाळ करीत असल्याचे सुध्दा निदर्शनास आले आहे. दरम्यान, या मतदारसंघात आतापर्यंत खर्च करण्यात अहीर, देवतळे व अ‍ॅड.चटप यांनी आघाडी घेतली आहे, तर अपक्ष व बीएसपी या उमेदवारांचा खर्च अजूनही लाखावर पोहोचलेला नाही, असेही पाहणीत दिसून आले आहे.