04 June 2020

News Flash

मतदानाचा गोंधळ टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिक मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांना आपले मतदान केंद्र कोठे आहे, कोणत्या यादीत नाव आहे याची

| April 24, 2014 12:25 pm

कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिक मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांना आपले मतदान केंद्र कोठे आहे, कोणत्या यादीत नाव आहे याची सविस्तर माहिती देत आहेत. जे मतदार स्थलांतरित झाले आहेत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे.
त्यामुळे स्थलांतरित माणूस कोठूनही मतदानासाठी शहरात आला तरी त्याला स्वत:ची छायाचित्रासह ओळख पटवून मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मतदार यादीतील मृत पावलेल्या मतदाराच्या नावापुढे लाल खूण करण्यात आली आहे. या सर्व सज्जतेमुळे मतदान करताना कोणावरही अन्याय होणार नाही आणि बोगस मतदानाला आळा घालण्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा आटोकाट प्रयत्न आहे, असे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. मतदार यादी तयार करताना परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेली इमारत, भव्य गृहसंकुल निश्चित करून त्या परिसरात राहणाऱ्या चाळी, इमारती, झोपडीमधील रहिवाशांची नावे मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्रस्तरीय निवडणूक कर्मचारी तसेच मतदारांना यादीतील नावे शोधताना अडथळे येत आहेत. प्रत्येक इमारत, चाळ, झोपडीप्रमाणे मतदारांची नोंद झाली तर यादीतील नाव शोधणे अवघड होणार नाही. जुन्या गोंधळामुळे यादीतील नाव शोधणे सध्या खूप कठीण होत आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांपूर्वी घरोघरी जाऊन निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदार यादीतील नाव, तेथील रहिवासी, त्यांचे पत्ते याविषयी पडताळणी केली होती. ज्या रहिवाशांनी घरे बदलली आहेत, ज्यांचे पत्ते बदलले आहेत. अशा मतदारांची कर्मचाऱ्यांनी ‘स्थलांतरित’ म्हणून मतदार यादीत नोंदणी केली आहे.
याद्यांमध्ये गोंधळ
पुण्याप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघातील याद्यांमधील गोंधळ उघड होऊ लागला आहे. डोंबिवलीतील माजी आमदार व मनसेचे पदाधिकारी हरिश्चंद्र पाटील, त्यांची पत्नी व दोन मुलांची छायाचित्रे मतदार यादीत आहेत. पण त्या छायाचित्रांपुढे अन्य व्यक्तींची नावे आहेत. स. वा. जोशी शाळेतील मतदार क्रमांक ६३० ते ६३४ पर्यंत यादीचा भाग क्रमांक २२६ मध्ये हा गोंधळ घालण्यात आला आहे. हा गोंधळ तातडीने मिटवण्यात यावा अशी मतदार नागरिकांची मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2014 12:25 pm

Web Title: election commission staff reaching voters house to avoid confusion
Next Stories
1 ४५ हजार पुस्तके वाचकांच्या दारी..!
2 मतपेटय़ा ठेवण्यासाठी व्यापारी बाहेर
3 आठवले गटाचे कार्यकर्ते नाराज
Just Now!
X