मतदारांनी आपल्याचकडे सत्ता सोपवावी यासाठी राजकीय पक्षांनी जाहिरातींचा भडिमार चालवला आहे. कल्पकता वापरून या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनी अशा एकापेक्षा एक सरस जाहिरातींनी मतदारजागृतीचे कार्य चालवले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने याबाबतीत कल्पकतेच्या दारिद्रयाचे दर्शन घडवले आहे. आयोगाने तयार केलेल्या भित्तीपत्रकांमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेचीही मोडतोड करण्यात आली आहे. ‘लोकशाही आपल्याने मतदान करा अभिमानाने’, ‘वृद्ध असो वा जवान, सर्वजण करा अवश्य मतदान’ असल्या भंपक जाहिराती आयोगाने तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे मतदानाला पाच दिवस बाकी राहिले असतानाही ही भित्तीपत्रके आयोगाच्या कार्यालयातच पडून आहेत!
मतदानाचा टक्का वाढावा, नागरिकांना मतदानाच्या हक्काचे महत्त्व समजावे यासाठी निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकर यांच्या संयुक्त विद्यमाने भित्तीपत्रके तयार करण्यात आली आहेत. एका भल्यामोठय़ा भित्तीपत्रकावर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी मतदारांना आवाहन करताना दाखविण्यात आली आहे. तिच्या छायाचित्राखाली ‘लोकशाही आपल्याने मतदान करा अभिमानाने’ अशा ओळी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ‘लोकशाही आपल्याने मतदान करा अभिमानाने’ ही ओळ वाचल्यानंतर काही अर्थबोध होतो का? शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने मतदान करावे यासाठी हिरव्यागार शेताच्या  पाश्र्वभूमीचे एक भित्तीपत्रक तयार करण्यात आले आहे. या शेतातील पिकावरच उभा राहून शेतकरी अन्य मतदान करण्याचे आवाहन करताना दाखविला आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सामानाचा भार वाहणारा कुली, मुंबईचा डब्बेवाला, टॅक्सीचालक अशी मंडळी मतदारांना आवाहन करताना भित्तीपत्रकावर दिसतात. टॅक्सीचालक हा टॅक्सीचा चालक वाटतच नाही. टॅक्सीचालक त्याच्या गणवेशात म्हणजे खाकी कपडय़ामध्ये दाखविण्याची गरज होती. परंतु भित्तीपत्रकावरील टॅक्सीचालक पांढऱ्याशुभ्र कपडय़ांत दिसतो. शिवाय त्याचा टॅक्सीबिल्लाही दिसत नाही.
अन्य एका जाहिरातीत ‘१५ ऑक्टोबरला मतदान करून आपला अधिकार दाखवून द्या’ असे म्हटले आहे. ‘अधिकार दाखवून द्या’ असा शब्द मराठीत वापरला जातो का? त्याऐवजी ‘हक्क बजावा’ अथवा ‘कर्तव्य पार पाडावे’ असे म्हटले असते तरी योग्य ठरले असते. ‘वृद्ध असो वा जवान, सर्वजण करा अवश्य मतदान’ या ओळीचेही असेच. मराठी भाषेतील भित्तीपत्रकात कोटी रचण्यासाठी ‘जवान’ या हिंदी शब्दाचा वापर करण्यात आला आहे. अशा अनेक चुकाचा या भित्तीपत्रकांत समावेश आहे.
‘मतदान करण्यासाठी मतदानयादीत नाव असणे गरजेचे आहे’ असे प्रत्येक भित्तीपत्रकावर स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच ठिकठिकाणी ही भित्तीपत्रके झळकवून जनजागृती करणे गरजेचे होते. परंतु मुंबईत त्यांचे वितरणच करण्यात आलेले नाही. कार्यालयामध्ये पडून असलेली ही भित्तीपत्रके घाईघाईने निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा खटाटोप काही अधिकारी मंडळी करीत आहेत. मतदानाला अवघे पाच दिवस राहिले असताना ही भित्तीपत्रके चिकटविण्यासाठी माणसे कुठून आणायची असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, या संदर्भात निवडणूक कार्यालयातील अधिकारी मोहड यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.