सोशल साईट्सवर पक्षीय, तसेच अपक्ष उमेदवारांचा प्रचार व अपप्रचार जोरात सुरू असून निवडणूक आयोगाने यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे याकडे दुर्लक्ष आहे. त्याचा परिणाम अनेक उमेदवारांचा अतिशय बदनामीकारक प्रचार सुरू आहे.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रचाराच्या विविध पारंपरिक पध्दतींना छेद देत यावेळी प्रथमच सोशल साईट्चा प्रचारासाठी मोठय़ा प्रमाणात वापर होतांना दिसत आहे. केवळ भाजप, आप व कॉंग्रेस आघाडीचेच उमेदवार सोशल साईट्सचा वापर करत नसून अपक्ष उमेदवारांकडूनही या हत्याराचाा वापर अतिशय चातुर्याने केला जात आहे. आजवर सोशल साईटच्या प्रचारात भाजपचे कार्यकर्ते उत्साही दिसत आहेत. भाजपचे हंसराज अहीर यांच्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरू असला तरी हंसराज अहीर मित्र मंडळ, तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक फेसबुकवर सक्रीय झाले असून अहीर यांना थेट विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. अजून अधिकृत प्रचाराला सुरुवात व्हायची असतांना अहीर निवडणूक जिंकतील, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा, अशा आवाहनाच्या जाहिराती, मजकूर फेसबुक, व्हॉटअप व ट्टिरवर बघायला मिळत आहे.
एखाद्याला विजयी करण्याच्या आवाहनासोबतच पालकमंत्री संजय देवतळे यांची बदनामी करणारा मजकूर फेसबूक, ट्टिरवर आहे. केवळ पक्षीय काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्तेच नाही, तर विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य सुध्दा आपण पालकमंत्र्यांना बघितले काय, असा मजकूर फेसबुकवर लिंक करत आहेत. त्यामुळे एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासोबतच दुसऱ्याची बदनामी करण्याचे षडयंत्र या सोशल साईट्वर सुरू आहे. केवळ भाजप कार्यकर्त्यांकडूनच हा प्रकार सुरू आहे, अशातला भाग नाही, तर अ‍ॅड. वामनराव चटप मित्र मंडळाच्या फेसबुक अकाऊंटवरूनही अशाच प्रकारच्या मजकूराच्या माध्यमातून आपचे अ‍ॅड. चटप यांना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे. अ‍ॅड. चटप समर्थित कार्यकर्तेही या कामात लागले आहेत, तर कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजय देवतळे व मित्र मंडळाकडूनही अशाच आशयाचे मजकूर फेसबूकवर अपलोड केला जात असल्याचे बघायला मिळत आहे.  एखाद्या पक्षासोबतच वैचारिक बांधिलकी असलेले काही लोकही फेसबुकचा वापर उमेदवारांच्या बदनामीसाठी करतांना दिसत आहे. वैचारिकदृष्टय़ा संघाशी जुळलेल्या अनेक शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांनी यात आघाडी घेतली आहे. अशा सामाजिक व सांस्कृतिक संघटनांच्या फेसबुक अकाऊंटवर गेल्या काही दिवसांमध्ये तर केवळ लोकसभा निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे.
समाज सुधारक फाऊंडेशनच्या वतीने नितीन पोहाने यांचाही फेसबुकच्या माध्यमातून याच पध्दतीचा प्रचार सुरू आहे, तर विविध वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या, विश्लेषणही फेसबुक, व्हॉट्अप व ट्टिरवर अपलोड केले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या सोशल साईट्वर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीचे सचिव जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते आहेत. यासंदर्भात रवी गिते यांच्याशी संपर्क साधला असता उमेदवारांच्या सोशल साईट्वर लक्ष असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. आयोगाने निर्देश केवळ उमेदवारांच्या फेसबुक व ट्टिवरवरून होणाऱ्या प्रचाराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे आम्ही केवळ उमेदवारांच्या साईट्ची नोंद घेऊन तेवढा खर्च पक्ष किंवा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात जोडण्याचे काम करीत आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकांनी सोशल साईटवर केलेल्या प्रचाराकडे लक्ष ठेवणे शक्य नाही. अशाही स्थितीत बदनामीकारक मजकूराची तक्रार मिळाली तर त्याची माहिती जिल्हा पोलिस दलाच्या सायबर सेलला देणार आहे. सायबर सेल त्याची योग्य ती दखल घेऊन कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले. सध्यातरी मिडिया सेल व समितीचे यावर पूर्ण लक्ष असल्याचेही गिते म्हणाले.
सोशल नेटवर्किंगमुळे तरुणांमध्ये वाढते गुन्हे
तरुण पिढीत वाढता सोशल नेटवर्किंगचा मोठय़ा प्रमाणात वापर व यामुळे होणाऱ्या गुन्ह्य़ातही वाढ होत असून गेल्या सहा वर्षांत तब्बल ४५ गुन्ह्य़ांची नोंद येथील सायबर सेलने घेतली आहे. परंतु याच सोशल नेटवर्किंगच्या गैरवापरामुळे अनेक प्रकारे गुन्हे समोर येत आहे. सोशल नेटवर्किंगमाध्यमातून २००८ व २००९ या काळात प्रत्येक १ तक्रार, २०१० मध्ये ३ गुन्हे, २०११ मध्ये ५, २०१२ ला १२ गुन्हे व २०१३ मध्ये तब्बल २१ गुन्हय़ांची नोंद सायबर सेलकडे करण्यात आली आहे. या सर्व गुन्हांचा तपास करण्यात आला असून यातील फक्त एका गुन्ह्य़ाचा तपास आजही करण्यात येत असल्याचे सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक प्रीती ताटे यांनी सांगितले. या सर्व प्रकरणात आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे नोंदवण्यात येत असून कारवाई करण्यात आली आहे. आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांंच्या वा सदस्यांचा फेसबुक अकाऊंटवरही सायबर सेलकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. जेणेकरून फेसबुकवरून प्रचार करतांना कोणत्याही प्रकारच्या पोस्ट अपलोड करतांना आचारसंहितेचा भंग झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून यासाठी सायबर सेलने कंबर कसली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक विशेष तुकडी तयार केली असल्याची माहिती ताटे यांनी दिली आहे.