लोकसभा निवडणुकीला आठ दिवस शिल्लक असताना शहरात आणि ग्रामीण भागात निवडणूक ज्वर आता चढू लागला आहे. पानाच्या व चहाच्या टपऱ्या, भाजीबाजार, शहरातील चौक अशा सार्वजनिक ठिकाणीच काय, पण बँका, तसेच विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये व सर्वसामान्यांतही निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. विविध राजकीय पक्ष उमेदवारांच्या जय-पराजयाची गणिते मांडण्याबरोबरच प्रमुख उमेदवारांच्या कोटय़वधींच्या संपत्तीचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.
नुकतीच गारपिटीने शेतक ऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असताना त्या गोष्टीचा राजकीय पक्षांना विसर पडत असताना सामान्य नागरिक त्याबाबत काहीच न बोलता कोण विजयी होईल, कोणाची सत्ता येईल, याबाबत गणिते मांडत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक उमेदवाराने संपत्तीचे दाखले दिले असून त्यातून प्रत्येक उमेदवारांकडे किती संपत्ती आहे, याची माहिती जनतेला झाली आहे. निवडणूक आयोगाने ही एक चांगली पद्धत सुरू केली, असे काहींचे मत असले, तरी बऱ्याच जणांना मात्र संपत्तीचे विवरण जाहीर करणे म्हणजे केवळ एक उपचारच असल्याचे वाटते. ‘यापेक्षा न दाखवलेली संपत्ती कितीतरी असणार’, असे स्पष्टपणे बोलून दाखवण्यात येते. त्यात पुन्हा अर्जांची छाननी करताना संपत्तीचे दिलेले विवरण खरे की खोटे, याचा काही संबंध नसल्याने बहुतेकांना तो केवळ उपचार वाटतो. गुन्ह्य़ांबाबत मात्र किमान त्यामुळे उमेदवार कसा आहे ते समोर येते, असे काहींना वाटते. उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रावर सादर केलेली ही माहिती प्रसिद्धी माध्यमातून जाहीर होत असल्याचेही अनेक नागरिकांना समाधान आहे.
निवडणूक आयोगाच्या प्रचारासंबंधीच्या कडक र्निबधांवर तर एकजात सगळेच खूष आहेत. भिंती रंगवून खराब होत नाहीत, पोस्टर्सची गर्दी दिसत नाही व कान किटवून टाकणाऱ्या लाऊडस्पीकर्ससह रिक्षा मोठय़ा संख्येने फिरत नाहीत. ‘हे फार चांगले झाले’ अशाच शब्दात बहुसंख्य नागरिक याबाबत आपल्या भावना व्यक्त करतात. प्रचारफे ऱ्यांना कोणाचीच हरकत नाही. किमान त्यामुळे उमेदवार व त्याचे समर्थक बघायला तरी मिळतात, असे त्यांना वाटते. विदर्भात मोठय़ा नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात राजकीय वातावरण तापत असताना समर्थक उन्हाची पर्वा न करता आपापल्या उमेदवारांसाठी मेहनत घेत आहेत. कुठलाही कार्यक्रम, समारंभ असो की, कोणाचे निधन झालेले असो, अशा ठिकाणी येणारे लोक आता केवळ निवडणुकीवर बोलू लागले आहेत. कोणाच्या किती जागा येतील, कोण उमेदवार निवडून येऊ शकतो, कुठल्या उमेदवाराने आतापर्यंत किती कामे केली, या विषयावर चर्चा झडत आहेत. विविध शासकीय, खाजगी कार्यालयासह बाजारपेठांमध्येही याच चर्चांचा फड आहे. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सोनिया गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध स्टार प्रचारकांच्या सभांना होणारी गर्दी, त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यांवर आणि विविध मुद्यांवर घराघरांमध्येही चर्चा होऊ लागल्या आहेत. काँग्रेसच्या पदयात्रेत किंवा गल्लोगल्ली घेण्यात येणाऱ्या छोटेखानी सभांमध्ये काँग्रेसच्या तीन ‘नाराज’ नेत्यांपैकी एकही दिसून येत नसल्यामुळे मतदारांमध्ये त्याबाबतही चांगलीच चर्चा आहे.
निवडणुकीच्या काळात हमखास दिसणारे विविध राजकीय पक्षांशी संबंधित असलेले अभिनेते फारसे अजूनही येथे प्रचारासाठी आले नाही. नागपूरसह विदर्भात कोणाला कुठे व कसा ‘लीड’ मिळेल, याचेही अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत.