महापालिकेच्या तीन झोनच्या सभापतीपदासाठी उद्या १६ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण सात नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली आहे. संख्याबळाच्या आधारावर झोन क्रमांक दोनमध्ये कॉंग्रेसच्या अनिता कथडे यांची निवड निश्चित मानली जात असली तरी झोन क्रमांक एक व दोनमध्ये कॉंग्रेस की भाजपचा सभापती निवडायचा, यात राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
महापालिकेत ६६ नगरसेवक असून प्रत्येकी २२ नगरसेवकांचा एक झोन, असे शहरात तीन झोन तयार करण्यात आले आहेत.  त्यात झोन क्रमांक एकमधून कॉंग्रेसचे महेंद्र जयस्वाल व भाजपच्या रवी गुरूनुले यांच्यात लढत होणार आहे. झोन क्रमांक दोनमध्ये कॉंग्रेसच्या अनिता कथडे व भाजपच्या माधुरी बुरडकर, तर झोन क्रमांक तीनमध्ये अपक्ष प्रदीप डे, कॉंग्रेसचे अनिल रामटेके व भाजपच्या ललिता गरात यांच्यात लढत आहे. झोन क्रमांक दोनमध्ये कॉंग्रेसचे १६, भाजपचे ४, अपक्ष ३ व राष्ट्रवादीचा १ नगरसेवक आहे. त्यामुळे संख्याबळाच्या आधारावर कॉंग्रेसच्या अनिता कथडे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. झोन क्रमांक एक व तीनमध्ये राष्ट्रवादीचे गटनेता संजय वैद्य ठरवतील तोच सभापतीपदी विराजमान होईल. कारण, संख्याबळाची सर्व सूत्रे राष्ट्रवादीच्या हातात आहेत. झोन क्रमांक एकमधून कॉंग्रेसचे महेंद्र जयस्वाल व भाजपचे रवी गुरूनुले यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या झोनमध्ये कॉंग्रेसचे ६, भाजप ९, शिवसेना ३, राष्ट्रवादी २, बसप १ व अपक्ष १, असे २२ नगरसेवक आहेत.  माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याशी असलेले राजकीय वैर बघता राष्ट्रवादीचे नेते धुन्नु महाराज यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही सभापतीपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका त्रिवेदी व संजय वैद्य यांचे मत मिळावे म्हणून ते स्वत: प्रयत्न करत आहेत, मात्र वैद्य यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यात कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया यांच्या घरी लग्नकार्य असल्याने त्या गैरहजर राहण्याची लाट शक्यता आहे. त्यामुळे झोन क्रमांक एकमध्ये जयस्वाल यांच्यापेक्षा गुरनुले यांचे पारडे जड आहे. झोन क्रमांक तीनमध्ये अपक्ष प्रदीप डे, कॉंग्रेसचे अनिल रामटेके व भाजपच्या ललिता गरात यांच्यात लढत आहे. स्थायी समिती सभापती नंदू नागरकर यांनी डे यांना समोर केले आहे.  यासाठी त्यांनी भाजप व भारिपच्या नगरसेवकांना एकत्र आणले आहे. झोन क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादीने भाजपला मदत केली, तर झोन क्रमांक तीनमध्ये भाजप अपक्षांना मदत करणार आहे. त्यामुळे येथेही राष्ट्रवादीच्या एका मताला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. एकूणच कॉंग्रेस व भाजपला या दोन्ही झोनमध्ये स्वत:च्या पक्षाचा सभापती निवडणूक आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीची गरज आहे, मात्र राष्ट्रवादीचे गटनेते संजय वैद्य यांनी सध्या तरी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
शिवसेना नाराज
गेल्या कित्येक वर्षांंपासून पालिकेत कॉंग्रेससोबत संसार करणाऱ्या शिवसेनेला एकही सभापतीपद मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक नाराज आहेत. महापालिकेत कॉंग्रेसकडून मिळणारी सापत्न वागणूक बघता शिवसेना नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.