नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या, शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून कळमना मार्केटमध्ये सुरू होणार आहे. यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून गुरुवारी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. मतमोजणी आणि परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी शंभर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  मतमोजणीच्या ठिकाणी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या ठिकाणची सर्व हालचाल कॅमेरे टिपणार आहेत. यासाठी मिनी कंट्रोल रुमही स्थापन करण्यात आली आहे. या ठिकाणी राखीव पोलीस जवानांना ठेवण्यात आले असून साध्या वेशातील गुप्तचर विभागाचे कर्मचारीही सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवत आहेत. मतमोजणीच्या ठिकाणांवर सर्व पक्षांचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी चिखली चौकाजवळील हरिओम कोल्ड स्टोरेजजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि पार्किंग सुविधेसाठी नागरिकांना मदत करतील. परिसरात सामान्य नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस दक्ष राहणार आहेत.