राज्य वीज वितरण कंपनीचे २ लाख १९ हजार रुपये थकल्याने कोपरगाव तहसील कचेरी व दुय्यम निबंधक कार्यालयाची वीज तोडण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांची कामे तर खोळंबलीच त्याचबरोबर महसूल कामकाजात मोठा व्यत्यय आला आहे. तहसीलदार, दुय्यम निबंधकांनी वारंवार वीज जोडणीची विनंती करूनही वीज वितरणने त्यांची मागणी धूडकावली.
वीज वितरण कंपनीचे शहर उपअभियंता व्ही. यू. मोरे यांनी सांगितले की, तहसीलकडे गेल्या अनेक वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे. २ लाख १९ हजार रुपये भरावे म्हणून विनंत्या केल्या. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला आहे.
पूर्ण रक्कम दिल्याशिवाय वीज जोडणार नसल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. दुय्यम निबंधक कार्यालय पालिकेच्या जुन्या दवाखान्यात आल्यानंतर त्यांची १० हजार रूपयांची बाकी झाली. मात्र ती बाकी दुय्यम निबंधकांनी भरायची की ठेकेदारांनी भरायची असा वाद आहे. दरम्यान, जुन्या रुग्णालयाची २ ते २.५ लाख रुपये बाकीही भरणे बाकी आहे.