० क्रॉस सबसिडी आकारात वाढ झाल्याने टाटा पॉवरच्या ग्राहकांना भरुदड
० रिलायन्सच्या छोटय़ा वीज ग्राहकांना दरवाढीपासून दिलासा
‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ला सोडचिठ्ठी देऊन ‘टाटा पॉवर’कडे गेलेल्या वीजग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या ‘क्रॉस सबसिडी आकारा’त राज्य वीज नियामक आयोगाने वाढ केल्याने अशा ‘स्थलांतरित’ घरगुती वीजग्राहकांना वीजवापरानुसार ७६१ ते १९७३ रुपयांचा मासिक भरुदड सोसावा लागणार आहे. त्याचवेळी या वाढीव आकारामुळे ‘रिलायन्स’च्या छोटय़ा वीजग्राहकांना अतिरिक्त दरवाढीपासून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हा आदेश ‘रिलायन्स’च्या २१ लाख सामान्य वीजग्राहकांसाठी आनंद तर ‘टाटा’कडे गेलेल्या ग्राहकांसाठी दरवाढीमुळे निराशा घेऊन आला आहे.
वीज आयोगाच्या आदेशामुळे ‘रिलायन्स’कडून स्थलांतरित झालेल्या घरगुती वीजग्राहकांवर प्रति युनिट दोन रुपये ५३ पैशांपासून तीन रुपये ९४ पैशांचा वाढीव बोजा पडणार आहे. आपल्याकडील बडे वीजग्राहक ‘टाटा’कडे निघून गेल्याने त्यांच्याकडून दरमहा ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना मिळणारे अनुदान बंद झाले आहे. त्यातून गेल्या दोन वर्षांत तब्बल एक हजार कोटी रुपयांचा बोजा ‘रिलायन्स’च्या छोटय़ा वीजग्राहकांवर थकला आहे. त्यामुळे तातडीने क्रॉस सबसिडी आकारात वाढ करावी अशी मागणी ‘रिलायन्स’ने केली होती. त्यानुसार वीज आयोगाने आता सुधारित अधिभार जाहीर केला आहे. यामुळे रिलायन्सच्या २१ लाख सामान्य वीजग्राहकांना अधिभारातून साडेसातशे कोटींचा वार्षिक दिलासा मिळेल.
 ‘रिलायन्स’ला येत्या दोन वर्षांत बुटीबोरीसह इतर प्रकल्पांतून सध्याच्या तुलनेत स्वस्त दरात वीज मिळणार आहे. त्यामुळे ‘टाटा’ व ‘रिलायन्स’चे दर जवळपास सारखेच होतील. त्यातून मग उलटे स्थलांतर सुरू होण्याची म्हणजे ‘टाटा’कडून पुन्हा ‘रिलायन्स’कडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत मग मुंबई उपनगरातील वीजसेवा व्यवसायातील स्पर्धा नाहिशी होण्याचा धोका आहे, असे मत वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी व्यक्त केला.  
तेव्हा आणि आता..
० ‘टाटा’कडे गेलेल्या ग्राहकांना दरमहा ५०० युनिटपर्यंत वीजवापर असल्यास अधिभार लागू नव्हता. आता ३०१ युनिट ते ५०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्यांना प्रत्येक युनिटमागे दोन रुपये ५३ पैसे जादा मोजावे लागतील. त्या हिशेबाने या गटातील ग्राहकांना वीजवापरानुसार दर महिन्याला ७६१ रुपये ते १२६५ रुपये जादा मोजावे लागतील.
० दरमहा ५०१ युनिट वा त्यापेक्षा अधिक वीजवापर असणाऱ्यांना केवळ तीन पैसे प्रति युनिट असा अधिभार लागत होता. आता हा दर तीन रुपये ९७ पैसे झाल्याने प्रति युनिट तीन रुपये ९४ पैसे जादा मोजावे लागतील. म्हणजे या गटातील घरगुती ग्राहकांना दरमहा किमान १९७३ रुपये जादा मोजावे लागतील.
० अधिभारामुळे ‘टाटा’कडे गेलेल्या वीजग्राहकांना मोठा फटका बसणार असला तरी ‘रिलायन्स’च्या दरांशी तुलना करता ३०१ ते ५०० युनिट वीजवापर असणाऱ्यांना वाढीव अधिभारानंतरही प्रति युनिट दीड रुपये स्वस्त वीज मिळणार आहे. म्हणजे याच गटातील ‘रिलायन्स’च्या ग्राहकांच्या तुलनेत त्यांना दरमहा ४५० ते ७५० रुपयांचा लाभ होईल.
० तर दरमहा ५०१ युनिट व त्यापेक्षा अधिक वीजवापर असणाऱ्यांना ‘रिलायन्स’च्या तुलनेत प्रति युनिट ४२ पैसे स्वस्त वीज मिळेल. म्हणजेच त्यांना ‘रिलायन्स’च्या ग्राहकांच्या तुलनेत किमान २१० रुपयांचा लाभ होईल.