संपूर्ण राज्यात गणरायाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू असताना, श्रीगणेशाच्या सजावटीसाठी झगमगीत रोषणाईची तयारी चालू असताना राज्य वीज नियामक आयोगाने मात्र राज्यातील सर्वच वीजग्राहकांना दरवाढीचा मोठा झटका दिला आहे. महापारेषण आणि महानिर्मिती या दोन कंपन्यांच्या मागील तीन वर्षांतील थकलेल्या शुल्काची ३६८६ कोटी रुपयांची रक्कम राज्यातील वीज ग्राहकांकडून गोळा करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी मंजुरी दिली. त्यामुळे मुलुंड-भांडुपपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वीजग्राहकांसाठीचा वीजदर सरासरी प्रतियुनिट ७५ ते ८० पैशांनी वाढणार आहे. महापारेषण आणि महानिर्मिती या दोन कंपन्यांचा मागील खर्चाचा ताळेबंद, केंद्रीय विद्युत अपिलीय लवादाने मंजूर केलेले खर्च, यांपोटी गेल्या तीन वर्षांत ३६६८ कोटी रुपयांची रक्कम २०१० पासून थकली होती. या रकमेला वीज आयोगाने पूर्वीच मंजुरी दिली होती. पण राज्यातील वीज ग्राहकांकडून ती गोळा करण्याचा आदेश रोखून ठेवला होता. आता अचानक ही सर्व रक्कम एकाच वेळी दरवाढीच्या रुपाने ग्राहकांकडून गोळा करण्याचा आदेश व्ही. पी. राजा यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वीज नियामक आयोगाने दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दरवाढीचा झटका बसणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांत ही ३६८६ कोटी रुपयांची रक्कम ग्राहकांकडून वीजबिलातून घेतली जाईल. त्यामुळे सरासरी प्रतियुनिट ७५ ते ८० पैशांचा भरुदड ग्राहकांना बसणार आहे. मात्र वीजवापर आणि ग्राहक गटानुसार ही दरवाढ किमान ४० ते ५० पैसे प्रतियुनिट ते कमाल एक रुपया प्रतियुनिट इतकी असेल, असा अंदाज आहे. इंधन समायोजन आकारातून ही दरवाढ वसूल केली जाईल.
व्ही. पी. राजांमुळे प्रजेला झटका
ही ३६८६ कोटी रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने गोळा झालेली आहे. त्या त्या वेळी ही रक्कम ग्राहकांकडून वसूल करण्यास परवानगी दिली असती, तर एकत्रित एवढी मोठी रक्कम साठली नसती. तसेच ग्राहकांनाही माफक प्रमाणात दरवाढीला सामोरे जावे लागले असते. मात्र ही रक्कम एकत्र साठवून एकाच वेळी दरवाढीचे संकेत व्ही. पी. राजा यांनी दिल्याने प्रजेला चांगलाच झटका बसला आहे. तसेच या दरवाढीचा पैसा महापारेषण आणि महानिर्मिती या दोन कंपन्यांना जाणार असल्याने आमच्या कंपनीच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास याचा दमडीचाही उपयोग होणार नाही, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.