नादुरुस्त मीटर असलेल्या ग्राहकांना महावितरणने वाढीव देयके पाठविल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. ही देयके कमी करून घेण्यासाठी ग्राहकांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली असून वीज वापरापेक्षा कमी देयके येत असताना देयके कमी कशी अशी विचारणा करण्यासाठी तुम्ही कार्यालयात का आला नाहीत, असे प्रश्न अधिकारी ग्राहकांना विचारत आहेत. महावितरणाच्या या अनागोंदी कारभारावर ग्राहकांनी संताप व्यक्त केला. नादुरुस्त वीज मीटर असलेल्या ग्राहकांकडून तूट भरून काढण्यासाठी महावितरणे ही शक्कल लढवली असल्याची माहिती अधिकारी खासगीत देत आहेत.
उरण तालुक्यातील महावितरणच्या ग्राहकांना ऑक्टोबर महिन्याच्या वीज देयके वापरापेक्षा अधिक आली आहेत. तालुक्यातील ४० हजार ग्राहकांपैकी २० टक्के ग्राहकांना ही वाढीव देयके पाठविण्यात आली आहेत. वाजवीपेक्षा अधिक देयक आल्याने ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयांकडे धाव घेतली आहे. उरणमधील ७ ते ८ हजार कमी देयके भरणाऱ्या, तसेच नादुरुस्त मीटर असलेल्या ग्राहकांच्या देयकाची तूट भरून काढण्यासाठी ही शक्कल लढविली असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याचा भरुदड मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसला असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
उरण तालुक्यातील वीज ग्राहकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या ग्राहकांना मागील महिन्यात महावितरणने केलेल्या वीज कपातीमुळे दिलासा मिळाला होता. मात्र याचा वचपा ऑक्टोबर महिन्यात काढत तालुक्यातील १ ते ५० युनिटचा वापर असलेले ग्राहक तसेच ज्यांचे मीटर नादुरुस्त आहेत. अशा ग्राहकांकडून महावितरण कंपनीला कमी देयक मिळत असल्याने होणारे नुकसान भरून काढण्यासाठी महावितरणने आलिशान बंगले ते झोपडपट्टीत राहणारे रहिवाशी यांच्याकडून वापरल्या जाणारी उपकरणे यांचा अंदाज घेत सर्व ग्राहकांच्या वीज देयकात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वापर वाढलेला नसताना वाढीव देयके कशी असा प्रश्न ग्राहकाला पडला आहे. या संदर्भात उरण विभागाचे महावितरणचे सहाय्यक अभियंते उपेंद्र सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता उरणमधील ग्राहकांची वीज देयकाची रक्कम वाढली असल्याची कबुली त्यांनी दिली तसेच नादुरुस्त मीटर तसेच १ ते ५० युनिटचा वापर असलेल्या ठिकाणावरून महावितरणला योग्य ते देयक मिळत नसल्याने इतर ग्राहकांच्या वापराचा अंदाज घेत ही देयके वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे २० टक्के ग्राहकांच्या तक्रारी आम्हाला अपेक्षित होत्या.