विजेचे बिल थकीत असल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या कापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल-परवा केली असली, तरी अमरावती विभागात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ‘महावितरण’ची मोहीम सुरूच असून विभागातील सुमारे दीड लाख कृषीपंपधारकांची वीज कापण्यात आली आहे.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांमध्ये ३ लाख ४७ हजार कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे १ हजार २७४ कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार कृषीपंप ग्राहकांचा वीजपुरवठा कापण्यात आला आहे, अशी माहिती ‘महावितरण’तर्फे देण्यात आली आहे. एप्रिल २०१२ ते जून २०१३ या कालावधीतील थकीत वीज देयकासाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. गेल्या १० सप्टेंबरला नागपूर येथे बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांची वीजजोडणी कापणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, ‘महावितरण’ने मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयाचा आधार घेऊन थकबाकीदार शेतकऱ्यांकडील वीज कापण्याची मोहीम थांबवली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्राहकांच्या दारात वीज नेण्यासाठी सरासरी प्रती युनिट ५ रुपये ५६ पैसे खर्च येत असताना कृषीपंपांना प्रति युनिट १ रुपयापेक्षाही कमी दराने वीज दिली जाते. मात्र, वीज देयकांचा भरणा ग्राहक करीत नसल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
अमरावती विभागात कृषीपंपांसाठी वीजजोडणी घेतल्यापासून १ लाख १० हजार कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी, तसेच गेल्या १० वर्षांपासून ५९ हजार ग्राहक शेतकऱ्यांनी वीज देयके भरलेली नाहीत. ही आकडेवारी महावितरणसाठी चिंतेचे कारण बनली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एप्रिल २०१२ ते जून २०१३ या कालावधीतील ५ त्रमासिक बिलांपैकी २ त्रमासिक बिलांची रक्कम तातडीने भरणे आवश्यक असून उर्वरित ३ त्रमासिक बिलाची रक्कम ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत समान हप्त्यांमध्ये भरण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आल्यामुळे कृषीपंपधारकांनी थकीत देयकांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे अन्यथा, नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराच महावितरणने दिला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा मात्र हवेतच विरून गेली आहे.
अमरावती विभागात कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक १ लाख २३ हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्य़ात आहेत. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्य़ात ९५ हजार ८१८, यवतमाळ ८५ हजार ७९५, अकोला ४१ हजार ३१८ आणि वाशीम जिल्ह्य़ात ४० हजार १३ शेतकरी आहेत. गेल्या दशकभरात बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्याही बुलढाणा जिल्ह्य़ातच आहे.
या जिल्ह्य़ातील १ लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी दहा वर्षांपासून वीज बिल भरलेले नाही. वीजपुरवठा घेतल्यापासून ३७ हजार शेतकऱ्यांनी बिल भरण्यासाठी केंद्राचा दरवाजा गाठलेला नाही. अमरावती विभागात ज्यांनी आजवर बिल भरलेले नाही, अशा एकूण १ लाख १० हजार कृषीपंपधारकांकडे ४४५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
‘महावितरण’च्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. खरीप पीक अजूनपर्यंत पूर्णपणे हाती आलेले नाही. अतिवृष्टीग्रस्त भागात तर शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत.