उरण तालुक्यातील सडलेले खांब तसेच विजेच्या तारांमुळे पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच मंगळवारी उरण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोटनाका येथे महावितरणच्या सबस्टेशनमधून वीज वाहिन्यांसाठी टाकण्यात आलेला विजेचा खांब सडल्याने कोसळला आहे. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र तालुक्यातील जर्जर अवस्थेतील विजेचे खांब नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. दररोजच्या विजेच्या खेळखंडोब्यामुळे उरणकर नागरिक हैराण झालेले असताना आता उरण शहरातील नागरिकांना सडलेल्या विजेच्या तारा व खांबांमुळेही जीव मुठीत घेऊन जगावे लागणार आहे. शहरातील महावितरण कंपनीची झाडे छाटण्याची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे झाडांच्या फांद्या मुख्य वीज वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने पावसात तारांची घसरण होऊन आग लागल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. त्यातच सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ासंदर्भात नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाच्या दूरध्वनींवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास कर्मचारी फोन उचलला जात नाही. चुकून फोन उचल्यास नागरिकांना उद्धट उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात महावितरणचे सहायक अभियंता उपेंद्र सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत, मात्र पहिल्या पावसामुळे वीज खंडित होण्याची कारणे सापडण्यास वेळ लागत असून कर्मचाऱ्यांचीही कमतरता असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.