डोंबिवली शहरात शनिवारपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा काही तासांसाठी खंडित होत असल्याने नागरिक अक्षरश हैराण झाले आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून डोंबिवली पश्चिमेचा वीजपुरवठा पाच तास बंद होता. मानपाडा भागातील सर्वोदय गार्डन संकुल परिसरातील वीजपुरवठा रविवारी रात्री बारा ते सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत बंद होता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता डोंबिवली पश्चिमेतील वीजपुरवठा खंडित झाला.
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगाची काहिली होत असताना सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळे डोंबिवलीकरांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. मानपाडा रोडवरील सर्वोदय गार्डन भागात रात्री बारा वाजता वीजपुरवठा बंद झाला. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी रहिवाशांचा संपर्क होऊ शकला नाही.
रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने या भागाचा वीजपुरवठा बंद असल्याचे रहिवाशांना सांगण्यात आले. सकाळी दहा वाजता मानपाडा रस्ता भागाचा वीजपुरवठा सुरू झाला. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता डोंबिवली पश्चिमेतील काही भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
ग्राहक सेवा कक्षाचा संपर्क क्रमांक सतत व्यस्त येत असल्याने वीजपुरवठा बंद होण्यामागचे कारण कळू शकले नाही. वीजपुरवठा बंद असल्याची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन दुरुस्तीचे काम सुरू करतात.
‘केडीएमसी’च्या खोदकामाचे प्रताप  
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहरातील मुख्य रस्ते, चौक सिमेंट रस्ते, सेवा उपयोगिता वाहिन्यांच्या नावाखाली खणून ठेवले आहेत.
हे रस्ते जेसीबीच्या साहाय्याने खणले जातात. त्यामुळे भूमिगत महावितरण, दूरध्वनीच्या वाहिन्यांना धक्का पोहचतो. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शहरातील नागरिकांना याचे चटके सहन करावे लागत आहेत.
एमटीएनएलच्या दूरध्वनी वाहिन्यांना यापूर्वी धक्का बसल्यामुळे गेल्या महिन्यात तब्बल सात हजार दूरध्वनी बंद असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. महावितरणच्या वाहिनीला धक्का बसल्याने डोंबिवलीकरांना विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागते. पालिकेच्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांचा कोणताही अंकुश नसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.