गंगापूर धरणातून पाणी उचलणाऱ्या यंत्रणेचा तांत्रिक दोषामुळे बंद झालेला वीज पुरवठा मध्यरात्रीच सुरळीत झाल्यामुळे बुधवारी शहरात काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. काही ठिकाणी पुरेसे पाणी न आल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर दुसरीकडे वीज पुरवठा सुरळीत झाल्याने नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा झाल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाने केला आहे. तांत्रिक दोषामुळे रात्री दोन ते तीन तास वीज पुरवठा बंद असल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याची साशंकता या विभागाने व्यक्त केली होती. परंतु, मध्यरात्रीच उपकेंद्रातील वीज वाहिनी दुरुस्तीचे काम झाल्यामुळे धरणातून पाणी उचलण्यावर फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले.
शहराला गंगापूर व दारणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. नाशिकरोड परिसरास दारणा धरणातून तर उर्वरित भागास गंगापूरमधून पाणी पुरविले जाते. शहराच्या पाणी पुरवठय़ाची मुख्य भिस्त गंगापूर धरणावर आहे. धरणातून पाणी उचलण्यासाठी पालिकेने थेट जलवाहिनी टाकली आहे. जलवाहिनीमार्फत हे पाणी शहरात आणून त्यावर शुध्दीकरण प्रक्रिया केली जाते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गंगापूर धरणातून पाणी उचलणारी यंत्रणा ठप्प झाली. वीज वाहिनीतील दोष दूर करण्यास कालापव्यय लागणार असल्याने धरणातून पाणी उचलता येईल की नाही याबद्दल पाणी पुरवठा विभाग साशंक होता. सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी या विभागाचे प्रमुख आर. के. पवार यांनी उपकेंद्रात उद्भवलेल्या दोषांची माहिती दिली. त्याच्या दुरुस्तीस विलंब लागण्याची शक्यता असल्याने बुधवारी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. तथापि, शहराचा पाणी पुरवठा महत्वपूर्ण असल्याने महावितरणने युध्दपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. मंगळवारी रात्री वीज पुरवठय़ात तांत्रिक दोष निर्माण झाले होते. यामुळे अनेक भाग अंधारात बुडाले. रात्रीच वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले. साधारणत: दोन तासानंतर धरणातून पाणी उचलणाऱ्या व्यवस्थेचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. या कालावधीत धरणातून पाणी उचलण्याचे काम बंद होते. या वाहिनीच्या दुरुस्तीकामास प्राधान्य दिल्यामुळे काही तासात वीज पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
दोन तासानंतर गंगापूर धरणातून पाणी उचलण्याचे काम पूर्ववत झाले. यामुळे बुधवारी शहराच्या पाणी पुरवठय़ावर काही परिणाम झाला नसल्याचा दावा या विभागाने केला आहे. पाणी वितरणातील त्रुटींमुळे एरवी अनेक भागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. या घडामोडींमुळे काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
गंगापूर रस्त्यावरील काही भागात काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. बुधवारी त्यात आणखी भर पडल्याची तक्रार स्थानिकांनी केली. उंचावरील भागातही पुरेसे पाणी आले नसल्याचे सांगण्यात आले.