संगणक प्रशिक्षण ठप्प
वाणिज्य दराने वीजपुरवठा होत असल्याने सध्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये बत्ती गुल असून त्याचा थेट परिणाम संगणक प्रशिक्षणावर झाला असल्याचे शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीत उघड झाले. जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ४४ शाळा असून त्यांपैकी ८०८ शाळांमध्ये संगणक कक्ष आहेत. मात्र विजेअभावी ५० शाळांमधील संगणक कक्ष बंद आहेत.
वाणिज्य दराने येणारे वीज देयक काही शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक गावकऱ्यांच्या मदतीने कसे तरी भरतात. मात्र अशी जमाखर्चाची तोंडमिळवणी करू न शकलेल्या अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना विजेशिवायच शाळेचे कामकाज चालवावे लागते. संगणक सुविधेवर त्याचा थेट परिमाण झाला आहेच, शिवाय पावसाळ्याच्या दिवसांत अनेक शाळा इमारतींमध्ये अंधार असतो. वीज नसल्याने त्या अपुऱ्या प्रकाशातच विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. सुभाष पिसाळ यांनी नियोजन सभेच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शाळांना वाणिज्यऐवजी घरगुती दराने वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागीय अधीक्षक अभियंता नरेंद्र इंदुलकर यांनी दिली.
पालकमंत्री भरणार वीज बिल
संगणक कक्ष बंद असणाऱ्या ५० शाळांचे वीज बिल वैयक्तिक निधीतून भरण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री गणेश नाईक यांनी बैठकीत केली. या शाळांचे सुमारे ५ लाख रुपये बिल थकीत असून बुधवापर्यंत संबंधित विभागात बिल भरून या शाळा सुरू होण्यापूर्वी त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.