विद्युत पारेषण कंपनीतील सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटनेचे सचिन राऊत यांच्या नेतृत्वाखाली कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात आले असून पाच दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विद्युत पारेषण कंपनीच्या जिल्हा परिक्षेत्रात सुमारे २१० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. या रक्षकांना वर्षांपासून सुधारित महागाई भत्ता राज्य सासनाने लागू करूनही वेतनवाढ मिळालेली नाही. पाच महिन्यापासून वेतन मिळत नसल्याने उपासमार होत आहे. या दिरंगाईसाठी विद्युत पारेषणचे कार्यकारी अभियंता जबाबदार असून त्यांना येनकेन प्रकारे सुरक्षा रक्षकाच्या जागी खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून नवीन सुरक्षा रक्षकांची भरती करावयाची असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. नोकरी सोडावी म्हणून सुरक्षा रक्षकांना त्रास देण्यात येत असल्याचे राष्ट्रीय मजदूर फोर्स सुरक्षा रक्षक कामगार युनियनने म्हटले आहे. अधिकारी वेतनाचा धनादेश उशीरा काढतात. पाच वर्ष इमानेइतबारे काम करून वेतनातून कर वजा जाता पाच हजाराच्या कमी वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत असल्याने राऊत यांनी सुरक्षा रक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी व अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी लक्ष्मण कोळी, डेव्हिड नागीनकर, नामदेव तुंगार यांनी कामगार उपायुक्त राजाराम जाधव यांना निवेदन दिले. या अन्यायाविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संजय काळे, श्रीकांत डोंगरे, दिगंबर सरोदे, निवृत्ती देवरे आदींसह नाशिक शहर व जिल्ह्य़ातील सुरक्षारक्षक सहभागी झाले होते.